Wakad : आळंदी यात्रेसाठी निघालेल्या दिंडी सोहळ्याचे वीर सावरकर योग परिवारातर्फे श्रमदान

मसाज करून केली वारकऱ्यांची सेवा

एमपीसी न्यूज- श्री क्षेत्र दलमंदिर पुगांव, रोहा येथून आळंदीकडे निघालेल्या श्रीमंत सदगुरू पद्मनागाचार्यस्वामी शिष्य सांप्रदाय अमृतनाथस्वामी शाखेच्या दिंडी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 30) वीर सावरकर योग परिवार आणि लायन्स क्लब्ज ऑफ पुणे आकुर्डी यांच्या वतीने वाकड येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सुमारे 100 साधकांनी यावेळी मसाज करून या वारकऱ्यांची सेवा केली.

रोहा येथून 25 नोव्हेंबर रोजी या दिंडी सोहळ्याने आळंदीकडे प्रस्थान केले. या दिंडी सोहळ्यामध्ये 600 पुरुष आणि महिला वारकरी सहभागी झाले होते. मागील 18 वर्षांपासून हा दिंडी सोहळा अव्याहतपणे सुरु आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा आहे. दरवर्षी भगवी पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करीत लाखो वारकरी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होतात. त्याचप्रमाणे आळंदी यात्रेसाठी रोहा येथून हा दिंडी सोहळा निघतो. या दिंडी सोहळ्यामध्ये आदिवासी समाजाबरोबरच इतर सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. या दिंडीसोहळ्यामध्ये वारकरी आणि मानवधर्माचे सर्व नियम पाळले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी, व्यसन याविषयीचे मार्गदर्शन केले जाते.

सदरची दिंडी भूमकर चौकातील चंद्रमाउली गार्डन वाकड येथे आली असता वीर सावरकर योग परिवार पिंपरी-चिंचवड आणि लायन्स क्लब्ज ऑफ पुणे आकुर्डी यांच्या सुमारे 100 साधकांनी वारकऱ्यांची मसाज सेवा केली. यावेळी योगगुरू रमेश मांडवकर, सुमन भोंडवे, माजी नगरसेविका छाया फंड, ह. भ. प वाडेकर, एमपीसी न्यूजचे अनिल कातळे, वीर सावरकर योग परिवार अध्यक्ष विठ्ठल झोडगे, आकुर्डी लायन्स क्लबचे अध्यक्ष हिरामण गवई, राजेंद्र कोळी, विवेक साबळे, रेश्मा मांडवकर ,पल्लवी नारखेडे, जयश्री ओझर्डे, मनीषा भारती आदी उपस्थित होते.

वीर सावरकर योग परिवाराच्या वतीने मणक्याच्या विकारावर शिबिराचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध डॉक्टरांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.