Wakad : ‘त्या’ सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी काढली धिंड

एमपीसी न्यूज – तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करणा-या तसेच परिसरात दहशत निर्माण करणा-या चार सराईत गुन्हेगारांच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांची वाकड परिसरातून आज, बुधवारी (दि. 25) धिंड काढण्यात आली.

अरविंद गौरव साठे (वय 20), सुरज पंडित पवार (वय 21), राहुल उर्फ बुग्या हिरामण लष्करे (वय 19), विशाल शहाजी कसबे (वय 23) अशी धिंड काढलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांपासून आरोपी वाकड परिसरात दहशत निर्माण करीत होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपी कसबे याला तडीपार केले होते. तरी देखील तो परिसरात येऊन त्याच्या साथीदारांच्या मदतीने दहशत निर्माण करीत होता.

रविवारी मल्हारी मोतीराम लोंढे (वय 28, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) हा तरुण त्याच्या घरासमोर उभा असताना दहा ते बाराजण तेथे आले. त्यांनी मल्हारी यांना दमदाटी करून काळा खडक येथील पाण्याच्या टाकीजवळ नेले. तेथे असलेल्या आरोपी शाहरूख खान याने फिर्यादी यांना कानाखाली मारली. ‘तू काय लय मोठा झाला काय, मी भेटायला बोलावूनही तू येत नाही. तुझ्यासाठी थांबायला आम्ही काय वेडे आहोत काय, तू आम्हाला जागा भाड्याने न देता, दुस-याला देतो, तुझी मस्तीच जिरवतो’, असे म्हणून शाहरुख खान याने शिवीगाळ केली.

तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपींनी फिर्यादी मल्हारी यांना जखमी केले. याप्रकरणी बाळू भोसले, शाहरुख खान, अरविंद साठे, आकाश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), राहुल पवार, सुरज पवार, बुग्या लष्करे, सोमा लोखंडे तसेच इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये वाकड पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांची धिंड काढली. वाकड पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.