Wakad News : वाकड, तळेगाव, चाकण, हिंजवडीत पाच चो-या

एमपीसी न्यूज – वाकड, तळेगाव दाभाडे, चाकण आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये चोरटयांनी एक लाख 18 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि तीन दुचाकींचा समावेश आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 27) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

शोभना शंकर कुलकर्णी (वय 58, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुलकर्णी शनिवारी सकाळी सहा वाजता पवनानगर, काळेवाडी येथे फिरण्यासाठी गेल्या होत्या. ज्योतिबा गार्डन येथे एका अनोळखी चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 70 हजारांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले.

चंद्रभान विश्वनाथ खळदे (वय 61, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घरात काम करणारा अजय भरत भानुसगरे (वय 25, रा. शेलाटणे, ता. मावळ) याने फिर्यादी यांच्या घरातून 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. याबाबत कामगार अजय याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी गोपाळ पाटील (वय 32, रा. मोई, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 20 हजारांची दुचाकी अज्ञात चोरटयांनी निघोजे गावच्या हद्दीत श्रीहरी पॅकेजिंग इंडस्ट्रीज या कंपनीच्या पार्किंगमधून चोरून नेली.

सागर राजेंद्र पवार (वय 27, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराच्या पार्किंगमधून त्याची 15 हजारांची दुचाकी चोरून नेली आहे. हिंजवडीत आणखी एक दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. दत्ता अर्जुन बोराडे (वय 34, रा. बावधन खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादी बोराडे यांची 25 हजारांची दुचाकी चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.