Maval : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने 2000 ते 2200 विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व

एमपीसी न्यूज : संपूर्ण भारतात 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव (Maval) सप्ताह साजरा केला जातो. लोकांना वन्यजीव संरक्षण आणि ते का महत्त्वाचे आहे? याची जाणीव करून लोकांपर्यंत माहिती पोहचवणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे.
गेली 10 ते 12 वर्ष वन्यजीव रक्षक मावळ संस्था संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये वन्यजीवांचे रक्षण, जनजागृतीचे तसेच त्यांच्या संगोपनाचे कार्य अविरतपणे कोणताही मोबदला न घेता अहोरात्र करत आहे. मागील दोन वर्ष करोना काळ असताना वन्यजीव सप्ताह साजरा करता आला नाही, तरी संस्थेने कार्य थांबवले नव्हते, फोन कॉल आला की ठरलेले संस्थेचे सदस्य सदर ठिकाणी जाऊन वन्यजीवांच्या संरक्षणाचे कार्य आपापल्या जीवाची काळजी घेऊन व्यवस्थितपणे करत होते.
यंदा वन्यजीव सप्ताह अजून उत्साहाने कसा साजरा होईल? यासाठी संस्थेने पुणे वन विभाग, वनपरिक्षेत्र वडगाव मावळ आणि वनपरिक्षेत्र शिरोता यांच्या संयुक्त विद्यमाने कंबर कसली होती आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचता येईल याचे परिपूर्ण असे नियोजन करण्यात आले होते.
सदर नियोजनाचे काम हे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश संपतराव गराडे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य तसेच वनविभागाचे कर्मचारी अधिकारी वर्ग यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा करून दर दिवसाचा जनजागृतीचा कार्यक्रम आखला गेला होता.
मावळ तालुका हा जैवविविधतेने समृद्ध आहे, याची जाणीव आम्हाला असली (Maval) तरी, इतरांना त्यांचे महत्त्व पटवून देणे त्यांचे पालन, पोषण, संगोपन आणि रक्षण करणे याबद्दल योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी वरिष्ठांकडून मिळत होते. कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेली आणि मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालय तसेच ग्रामीण भाग या ठिकाणी जाऊन सर्वांना या वनसंपदेचे आणि जैवविविधतेचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य संस्थेच्या सदस्यांनी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे केले. या वर्षी पुणे वनविभागाचे वनपरिक्षेत्र वडगाव मावळ तसेच वनपरिक्षेत्र शिरोता यांचे अधिकारी हे सर्व कान्हे, नानोली, साई, नाणे, कुने मावळ, निगडे, कारला, तळेगाव दाभाडे या ठिकाणच्या सर्व ग्रामीण शाळेमध्ये कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच शहरी भागातील महाविद्यालय यांचा यावर्षी या कार्यक्रमात आवर्जून सहभाग केला होता.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय, इंद्रायणी हायस्कूल, श्री एकविरा विद्या मंदिर येथील अडीचशे विद्यार्थ्यांना जिगर सोलंकी आणि संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन सर्च अँड रेस्क्युटीमचे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी जैवविविधता (वाइल्डलाइफ कंजर्वेशन) या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव व वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता येथील सुशील मंतावर यांनी वनविभागाचे कार्य, वन कायदा आणि भविष्यातील संवर्धन या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. सात दिवस पूर्णपणे नियोजनपर असे जनजागृतीचे कार्यक्रम संपूर्ण मावळ तालुक्यात शाळा महाविद्यालय यामध्ये राबवण्यात आले आणि संस्थेने यावर्षी 2000 ते 2200 विद्यार्थ्यांपर्यंत तसेच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत तसेच वाड्या- वस्त्यांवरील असलेल्या लोकांपर्यंत वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व (Maval) पोहोचवण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले.
यावर्षीचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांचे संरक्षण तसेच जैवविविधता, वनसंपदा यांचे संरक्षण कसे करावे आणि याचा भविष्यासाठी होणारा फायदा कसा घ्यावा या सर्व बाबी पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे होते. वन्यजीवांचे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत कशी होईल याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश गराडे तसेच संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे आणि संस्थेचे सदस्य सत्यम सावंत, श्रेयस कांबळे, निनाद काकडे, विनय सावंत, भास्कर माळी, दक्ष काटकर, रुजुत्ता काटे, झाकीर शेख यांनी दिली.

गेले सात दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमाची सांगता दिनांक 7ऑक्टोबर रोजी पुणे वनविभाग यांच्या मुख्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या कार्यक्रमांमध्ये झाली. सदर ठिकाणी गेल्या सात दिवसाची आढावा बैठक आणि उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अशासकीय संस्था तसेच कर्मचारी वर्ग या सर्वांना पुणे वनविभाग यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले आणि वन्यजीव सप्ताह संपन्न झाला.
https://www.youtube.com/watch?v=xMs1VlvHJZg&t=1s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.