Loni Kalbhor : भरलेल्या टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरणारे सात जण अटकेत, 80 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : पेट्रोलियम डेपोमधून (Loni Kalbhor) इंधनाने भरलेला टँकर निघाल्यानंतर त्यातून पेट्रोल आणि डिझेलची चोरी करणारे रॅकेट लोणी काळभोर पोलिसांनी उध्वस्त केले आहे. इंधनाची अशा प्रकारे चोरी करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 80 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमिर मलिक शेख (वय 32, रा. कदमवाक वस्ती, मुळ रा. बार्शी), सचिन भाऊराव सुरवसे (वय 30, रा. लोणी काळभेार), विजय मारूती जगताप (वय 52), महेश बबन काळभोर (वय 42), रामचंद्र रावसाहेब देवकाते (वय 41), धिरज विठ्ठल काळभोर (वय 36) आणि इसाक इस्माइल मजकुरी (वय 42) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यास ठाण्यात (Loni Kalbhor) गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कदमवाकवस्ती येथील दत्त हॉटेलच्या समोर महेश काळभोर यांच्या जागेत तसेच भारत टायर्सच्या मागे डिझेल-पेट्रोलची चोरी सुरू असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दत्ता चव्हाण, गुन्हे निरीक्षक सुभाष काळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत छापा टाकत पेट्रोल-डिझेल चोरीचे रॅकेटचा पर्दाफाश केला.
यावेळी 79 लाख 51 हजारांचे पेट्रोल -डिझेलचे दोन टँकर देखील मिळाले. टँकर लोणी काळभोर येथील आयओसीलए डेपोतील असल्याचे समोर आले आहे. यात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता आहे. याप्रकरणात संगणमत करून चोरी, अत्यावश्यक वस्तु अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे, अमोल घोडके यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.