Sangvi Crime News : सूनेसह सुनेच्या आई-वडिलांना मारहाण; पती आणि सासू पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – सुनेने बाहेरून जेवण ऑर्डर केले. या कारणावरून झालेल्या भांडणातून पतीने पत्नीच्या आई वडिलांना बोलावून घेतले. त्यानंतर पती आणि सासूने सुनेला, तिच्या आई-वडिलांना मारहाण केली. तसेच लहान नातवाला लोखंडी हुकाने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 3) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कृष्णा चौक, नवी सांगवी येथे घडली.

पोलिसांनी पती भावेश दयालजी परमार (वय 30) आणि सासू या दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मागवलेले जेवण त्या गेटवरून घेऊन आल्या. त्यावेळी आरोपी सासूने ‘तू कोणाला विचारून बाहेरून जेवण मागवले’, असे म्हणून त्यांच्या सोबत भांडण केले. त्यामुळे फिर्यादी त्यांची बॅग भरून वडिलांच्या घरी निघाल्या असता आरोपी पतीने फिर्यादी यांच्या वडिलांना फोन केला. ‘तुमची मुलगी माझ्या आईसोबत भांडत आहे. तिला तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा’, असे फोनवरून सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांचे आई-वडील फिर्यादी यांच्या घरी आले.

फिर्यादी यांच्या वडिलांनी आरोपी पतीला ‘तुम्ही भांडणे का करता’, असे विचारले. त्यावरून चिडून जाऊन पतीने शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या वडिलांची कॉलर धरून त्यांना खाली पाडले व हाताने मारहाण केली. आरोपी सासूने फिर्यादी यांच्या आईला व फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. बाळाच्या पाळण्याचा स्टीलचा हुक फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्या हुकाने फिर्यादी यांचा मुलगा रुद्रांश याच्या नाकावर मारून दुखापत केली असल्याचे सुद्धा फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आणि सासू यांना ताब्यात घेतले असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.