School Reopen: दीड वर्षांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळा, कनिष्ठ महाविद्यालये गजबजली

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सुमारे दीड वर्षांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आजपासून शाळा सुरु झाल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील 8 वी ते 10 वी पर्यंतच्या शाळा आणि 11 वी 12 वीची कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेली. शहरातील 282 शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आज सुरु झाली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले गेले. दीड वर्षांनी पहिल्यांदाच शाळेत जाता आल्याने विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद ओसांडून वाहत होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील 8 वी ती 12 वीचे वर्ग सुरु झाले आहेत. पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. एका बाकड्यावर एकच विद्यार्थ्याला बसविले होते.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळा गजबल्या. शहरातील काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. तर, काही ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या अल्प होती. मुलांचे लसीकरण झाले नसल्याने पालकांमध्ये थोडेसे भीतीचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, लस घेतली नसल्याने मुलाला शाळेत पाठवयाचे की नाही याचा पालकांकडून विचार केला जात आहे.

शाळांकडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, तापमान तपासण्याची गण ठेवली आहे. दरम्यान, फुगेवाडी येथील कै.मीनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात पिंपरी युवासेनेकडून विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर देऊन स्वागत करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या शिला जाधव , रामभाऊ शिंगोटे , शिवाजी काची , भालेराव सर व विद्यार्थी व शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेनेचे युवा अधिकारी निलेश हाके यांच्याकडून करण्यात आले होते.

हे आहेत नियम!

  • विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती आवश्यक
  • एका बाकावर एकच विद्यार्थी
  • सुरक्षित अंतराचे पालन
  • मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य
  • सर्व शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक
  • शाळेतील 100 टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक
  • शाळेचा परिसर स्वच्छ हवा
  • स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण
  • स्कूल बसचे दिवसातून किमान दोनवेळा निर्जंतुकीकरण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.