Pimpri News : जागतिक रंगभूमी दिन उत्साहात

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अभिनेत्री स्मिता कुलकर्णी, नेपथ्यकार प्रदीप तपस्वी, रंगभूषाकार सुधीर मारुलकर या रंगकर्मींचा नामांकीत अभिनेते, दिग्दर्शक संजीवकुमार पाटील व परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

मोजक्या रंगकर्मींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला संतोष शिंदे, राजेंद्र बंग, महेश लाकाळ तसेच, रंगकर्मी माधव जोगळेकर व आर.के. चौधरी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना भाऊसाहेब भोईर असे म्हणाले, येणारे वर्ष हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पंचवीसावे वर्षे असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नाट्य महोत्सव व नाट्यविषयक कार्यक्रम वर्षभर घेण्याचा मनोदय आहे. त्यासाठी शहरातील सर्व संस्थांना सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न असणार आहे. रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येलाच नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय झाला असल्याने दुधात साखर टाकल्यासारखेच झाले आहे. त्यामुळे, नाट्यकर्मीमध्ये उत्साह संचारलेला आहे. तसेच 50 टक्के आसन क्षमतेने नाट्यगृह सुरू होणार असल्याने नाट्यगृहाचे भाडेसुद्धा 50 टक्के केले जावे असा प्रस्ताव महानगरपालिकेला देणार असल्याचेही यावेळी भोईर म्हणाले.

नाट्य परिषदेच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासात येथील कलाकारांना खूप प्रोत्साहन मिळाले असे, डॉ. संजीवकुमार पाटील म्हणाले. परिषदेच्या पुढील वर्षाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संस्थांनी सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी अधोरेखित केले .

कार्यक्रमाचे संयोजन सुहास जोशी व किरण येवलेकर यांनी केले. गौरी लोंढे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, सत्कारार्थीचा परिचय सुहास जोशी यांनी करून दिला. नरेंद्र आमले यांनी आभारप्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.