Chinchwad : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनने एकाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 6) बीजलीनगर येथे करण्यात आली.

तुषार उर्फ दादया रविद्र खांगटे (वय 32, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी स्वामी, वेताळ, माने, जयवंत राऊत, नामदेव राऊत, अजित सानप गुरुवारी (दि. 6) चिंचवड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी जयवंत राऊत यांना माहिती मिळाली की, बीजलीनगर येथे एकजण पिस्टल घेऊन येणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून तुषार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. पिस्टल आणि काडतुसे जप्त करून तुषारला अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.