Worldcup 2023 : भारतीय संघाचा अश्वमेध वारू रोखण्यात पाकिस्तानला अपयश

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : भारतीय संघाने (Worldcup 2023) पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाला रोहीत शर्माच्या भारतीय संघाने 7 गडी आणि तब्बल 120 चेंडू राखून दणदणीत पराभूत करत आपला विजयी अश्वमेध वारू चौखूर उधळता ठेवला आहे. विशेष बाब म्हणजे Forward विश्व कप स्पर्धेत पाकिस्तान संघावरचा सलग आणि एकूणच हा आठवा विजय आहे, पाकिस्तान  संघ एकदिवसीय विश्वकप स्पर्धेत एकदाही भारतीय संघाचा विजयी रथ अडवण्यात यशस्वी ठरलेला नाही.

विश्व कप स्पर्धेतला सर्वात हाय व्होल्टेज सामना म्हणून संपूर्ण क्रिडाविश्व या सामन्याकडे अतिशय उत्सुकतेने बघत होते, मात्र जी चुरस,जी उत्कंठता या दोन संघातल्या सामन्यात क्रिकेट रसिकांना बघायला मिळते. यावेळेस मात्र तशी चुरस जराही बघायला मिळाली नसली तरी भारतीय संघाने पाकिस्तान संघावर पुन्हा एकदा दणदणीत मात करत आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.

अहमदाबाच्या  आलिशान आणि देशातल्या सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी मैदानावर दोन्हीही संघाचा हा एकूण तिसरा सामना होता. दोन्ही संघांनी आपापले आधीचे दोन्हीही सामने जिंकलेले असल्याने त्यांच्या आत्मविश्वासात कमालीची भर पडली होती.   हे खरे असले तरीही दिवसाखेर भारतीय संघानेच बाजी मारली.

Today’s Horoscope 15 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

दिवसरात्र झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल (Worldcup 2023) भारतीय संघाच्या बाजूने लागला. पण रोहित शर्माने पाकिस्तान संघाला फलंदाजीसाठी पाचारण करुन त्याच्या कुशल नेतृत्वशैलीचा पहिला परिचय दिला. कारण या मैदानावर नाणेफेक जिंकलेला कर्णधार पहिल्यांदा फलंदाजी करेल असाच अंदाज आधी व्यक्त गेला होता. भारतीय संघाने डेंग्यूमुळे पहिले दोन सामने खेळू न शकलेल्या आपल्या हूकमी अस्त्राला म्हणजेच शुभमन गीलला संघात ईशान किशनच्या जागी स्थान दिले.

पाकिस्तान संघाच्या डावाची सुरुवात इमाम उल हक आणि मागच्याच सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अब्दुला शफीक जोडीने चांगलीच करुन दिली होती, पहिल्या गड्यासाठी त्यांनी चेंडूस धाव या सरासरीने सुरुवात करून देताना 41 धावांची खणखणीत सलामी देत संघाला आश्वासक सुरुवात करून दिलीच होती की अफगाणिस्तान विरुद्ध महागडा ठरलेल्या सिराजने शफीकला पायचीत करत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले.

त्यानंतर खेळायला आला तो पाकिस्तान संघाचा (Worldcup 2023) कर्णधार बाबर आझम. त्याने इमान उल हकच्या साथीने लढाई पुढे चालू ठेवली होतीच की हार्दिक पंड्याने एका अप्रतिम आऊटस्विंगवर उल हकला चकवीत भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. इमान उल हकने 38 चेंडूंत सहा चौकार मारत 36 धावा केल्या.

यानंतर खेळायला आला तो पाकिस्तान संघातला अतिशय खतरनाक आणि जबरी फॉर्ममधे असलेला मोहम्मद रिझवान. या जोडीने पहिल्या दोन विकेट्सच्या पतनामुळे आलेले दडपण सहज झुगारून देत सुंदर फलंदाजी करत पाकिस्तान संघाचा डाव सावरला. दोघेही फलंदाज आकर्षक आणि आक्रमक अंदाजात फलंदाजी करत होते. बाबर आझम आजच्या तारखेला एकदिवसीय क्रिकेट मधला एक उत्तम फलंदाज मानला जातो. त्याला फॉर्म गवसलाय असे वाटत होते.

बाबर या नावाचा धसका इतिहासाने आपल्याला पुस्तकातून दाखवला असल्याने हा  बाबरही भारतीय गोलंदाजी बोथट करणार की काय अशी भीती यावेळी वाटत होती. बघताबघता बाबर आझमने आपले एकदिवसीय क्रिकेट सामन्यातले  वैयक्तिक 29 वे अर्धशतक पूर्ण केले.

आता तो मोठया खेळीसाठी तयार झालाय असे वाटत (Worldcup 2023) असतानाच भारतीय संघासाठी मोहम्मद सिराज पुन्हा एकदा संकटमोचक ठरला आणि त्याने एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाबाद करत ही जोडी फोडून मोठे यश मिळवून दिले. यावेळी पाकिस्तान संघाची धावसंख्या 3 बाद 159 अशी होती आणि पाकिस्तान संघाची फलंदाजी व झुंजार वृत्ती बघता पाकिस्तान संघ कमीत कमी 275 ते 300 धावा सहज करेल असे वाटत होते. मात्र बाबर पडला आणि त्याचबरोबर पाकिस्तान संघही एकदम मजबूत अवस्थेतून संकटात पडला.

तीन बाद 159 वरून पाकिस्तान संघ पुढील सात गडी गमावून केवळ 42 धावा करु शकला आणि केवळ 191 धावातच गारद झाला. रिझवान एकाकी झुंजला पण तो ही 49 च धावा करु शकला. यामुळेच पाकिस्तान संघ पाऊणेतीनशे तर सोडाच 200 ही धावा करु शकला नाही.त्यांचे सहा धुरंधर म्हणवणारे फलंदाज दोन आकडी धावा सुद्धा करू शकले नाही. याला कारणीभूत ठरले ते भारतीय गोलंदाज. एक शार्दुल ठाकूरचा अपवाद सोडला तर जडेजा,बुमराह, सिराज, कुलदीप आणि पंड्याने जबरदस्त गोलंदाजी करत प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले.

बुलंद आणि सध्या संपूर्ण भरात असलेली भारतीय फलंदाजी बघता हे आव्हान कधीच आव्हान वाटले नाही, पण तरिही पाकिस्तान समर्थकांना मात्र त्यांच्या भेदक मानल्या जाणाऱ्या गोलंदाजांवर विश्वास होता. पण डेंग्युवर सहज मात करुन संघात परतलेल्या शुभमन गीलने अतिशय सुंदर चार देखणे चौकार मारत पाकिस्तान संघाचे प्रमुख अस्त्र मानल्या जाणाऱ्या शाहीन आफ्रिदीवरच जबरदस्त हल्ला करत (Worldcup 2023) प्रतिआक्रमण करत भारतीय संघाला शुभ सुरुवात करुन दिली. त्याचे चौकार फक्त बघण्यासारखे होते.

तो त्याच त्याच्या चिरपरिचित फॉर्मात आलाय असे वाटत असतानाच शाहीन आफ्रिदीने त्याला बाद करुन बदला घेत भारतीय संघाला पहिला धक्का दिला. गीलने 11 चेंडूत चार देखणे चौकार मारत 16 धावा केल्या. यानंतर खेळायला आला तो विराट कोहली. पहिल्या दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केल्याने त्याचा आत्मविश्वास बुलंद होताच,पण आज त्यालाही फारसे खास काही करता आले नाही आणि तोही केवळ 18 धावा करुन आफ्रिदीचीच दुसरी शिकार ठरला.

पाकिस्तानी गोलंदाज आपल्याला सहजासहजी विजय मिळवू देणार नाहीत असे भारतीय प्रेक्षकांना वाटत होते पण कर्णधार रोहितच्या मनातही असल्या विचारांना थारा नव्हता. त्याने श्रेयस अय्यरच्या साथीने जबरदस्त फलंदाजी करत आपल्यावर कर्णधार म्हणून असलेल्या जबाबदारीलाही सार्थ न्याय दिला. रोहीतच्या सहजसुंदर फलंदाजीचे फॅन नाहीत असे क्रिकेट रसिक जगात असूच शकत नाहीत. तो भरात असला की त्याची फलंदाजी बघणे यापेक्षा मोठी मेजवानी असूच शकत नाही.

अफगाणिस्तान संघाविरुद्ध केलेल्या विश्वविक्रमी (Worldcup 2023) शतकी खेळीइतकीच सुंदर आणि स्फोटक फलंदाजी आजही

 करत त्याने आधीच सोपा वाटत असलेला विजय आणखीनच सहजसोपा करुन टाकला.आजही तो आणखी एक शतक करेल असे वाटत होते मात्र सुंदर स्वप्नांना दृष्ट लागते तशीच दृष्ट या देखण्या आणि सुंदर खेळीला लागली . वैयक्तिक 86 धावांवर असताना तो एक मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला.

पण तोवर भारतीय संघ या विश्व कप स्पर्धेतल्या आपल्या सलग तिसऱ्या आणि पाकिस्तान संघाविरुद्ध विश्व कप स्पर्धेतल्या सलग आठव्या विजयाचा अगदीच समीप आला होता, तरीही रोहितचे शतक हुकल्यामुळे असंख्य क्रिकेटरसिकांना चुटपुट लागून राहिली ती राहीलीच.

विजयी औपचारिकता श्रेयस अय्यर आणि के एल राहुलने 7 गडी आणि जवळपास 20 षटके राखून पूर्ण करून देताना भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध मोठा विजय मिळवून दिला.या विजयाने भारतीय संघ अंकतालिकेतही प्रथम स्थानावर विराजमान झाला आहे. यानंतरचा भारतीय संघाचा सामना बांगलादेश विरुद्ध असणार आहे. भारतीय संघाच्या विजयात भेदक गोलंदाजी करत केवळ 19 धावा देत दोन गडी बाद करून सिंहाचा वाटा उचलणारा जसप्रीत बुमराह सामन्याचा मानकरी (Worldcup 2023) ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.