Bhosari: रुग्णालय खासगीकरणाचा विषय पुनर्विचारासाठी महासभेसमोर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भोसरीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालय खासगी पद्धतीने चालविण्यास देण्याचा प्रस्ताव पुन्हा पुनर्विचारासाठी महासभेसमोर ठेवण्यात येणार आहे. वाढत्या विरोधानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने भोसरी येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. हे रुग्णालय खासगी पद्धतीने चालविण्यास देण्याच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी दिली आहे. तथापि, रुग्णालयाच्या खासगीकरणाला सत्ताधारी नगरसेवकासह विविध सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला होता. त्याच्या विरोधात निदर्शने केली होती. या विषयाला होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन, हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुनर्विचारासाठी सादर केला जाणार आहे.

याबाबत अॅड. सचिन गोडांबे यांनी हा प्रस्ताव विखंडीत करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. महापालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्रात ही माहिती नमूद केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, महापालिचे भोसरी रुग्णालय खासगी तत्वावर चालविण्यासाठी देण्यास विरोध असल्याची तक्रार प्रशासनाला 21 फेब्रुवारी 2019 रोजी प्राप्त झाली आहे. या तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. या विषयास महापालिका सभेने 4 फेब्रुवारी 2019 रोजी मान्यता दिलेली आहे. हा विषय पुनर्विचारार्थ पुढील तीन महिन्यानंतर महापालिका सभेसमोर सादर करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.