Pune : कर्ज फेडण्यासाठी सख्ख्या भावाच्या घरातच चोरी करणारा जेरबंद ; दोन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज- डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या उद्देशाने एका इसमाने आपल्या सख्ख्या भावाचे घर फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास केला. पुणे पोलीस शाखा युनिट 3 च्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

आरिफ शफी शेख (वय 36, रा. सर्व्हे नं 42, लिंग क्लासिक, कोंढवा) असे या प्रकरणी अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफ शफी शेख याचा सख्खा भाऊ मोसीन शफी शेख (वय 28, फ्लॅट नं 403, इब्राहिम एन्क्लेव्ह बिल्डिंग, कोंढवा) यांचे घर दि. 13 मे ते 1 जून 2019 दरम्यान कुलूप लावून बंद असताना अज्ञात इसमाने बनावट चावीने उघडून घरातील लाकडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून 2 लाख 11 हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचा तपास करीत असताना पोलीस कर्मचारी विल्सन डिसुझा यांना खबऱ्यामार्फत मोसीनचा सख्खा भाऊ आरिफ यानेच ही घरफोडी केल्याची माहिती मिळाली. तसेच चोरीचे सोने विकण्यासाठी कोळसे गल्ली, पुणे कॅम्प येथे तो येणार असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोळसे गल्ली येथे सापळा रचून आरिफ याला संशयावरून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवताच डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चोरीस गेलेले 90 ग्राम वजनाचे 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. आरिफ याने शाप्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरु आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे तसेच पोलीस कर्मचारी विल्सन डिसोझा, सचिन गायकवाड, मच्छिन्द्र वाळके, गजानन गनबोटे, दत्तात्रेय गरुड, दीपक मते, सुजित पवार, संदीप राठोड यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.