Chinchwad : चाकण पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 108 जणांना अटक

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची माहिती

एमपीसी न्यूज – मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाळण्यात आलेल्या बंद दरम्यान चाकण येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. तर याच दिवशी चाकण पोलीस ठाण्यावर काही लोकांनी हल्ला केला. यामध्ये पोलीस अधिका-यांसह पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर पोलीस ठाण्याची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी 108 जणांना अटक केली आहे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी याबाबत माहिती दिली. आयुक्त म्हणाले, “चाकण पोलीस ठाण्यावर काही जणांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. तसेच पोलीस ठाण्याची तोडाफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे दोन हजार लोकांची चौकशी करत दोषी आढळणा-या 108 जणांना अटक केली. आणखी 23 जण यामध्ये दोषी आढळले आहेत. तर अन्य 15 जणांची चौकशी सुरु आहे.

अटक केलेल्या वर चौकशी सुरु असलेल्या काही जणांचा राजकीय पक्षांशी संबंध आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता दोषी आढळणा-यांवर कारवाई केली जात आहे. या प्रकरणात एका माजी आमदारांचा देखील समावेश असल्याचे समोर येत आहे. त्याबाबत चौकशी केली जात आहे. चाकणमध्ये झालेले आंदोलन आणि पोलीस ठाण्यावरील हल्ला या दोन वेगवेगळ्या घटना लक्षात घेत तपास केला जात आहे.

पोलीस ठाण्यावर हल्ले करणा-या लोकांचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो आणि अन्य पुरावे पाहून कारवाई केली जात आहे. जे लोक या प्रकरणात दोषी आढळले, ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत का? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? तसेच अन्य कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न देता त्यांचा सहभाग आहे का? हे पाहून त्यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईला कोणत्याही निवडणुकीची पार्श्वभूमी नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.