Ravet: रावेत येथील पंपिंग बंद; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आज (मंगळवारी) विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पूर्ण शहराचा दुपारपासूनचा, सायंकाळचा आणि उद्या (बुधवारी) सकाळचाही पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 येथे पाणी शुद्ध करुन शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो.

रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राला विद्युतपुरवठा करणा-या MSEDCL च्या मीटरिंग किऑस्कमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे रावेत येथील संपूर्ण पंपिंग बंद पडले आहे. परिणामी, पूर्ण शहराचा दुपारपासूनचा तसेच सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. तसेच, उद्या सकाळचाही पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

MSEDCL मार्फत समन्वयाने दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. MSEDCL मार्फत दुरुस्ती झाल्यावर लवकरात लवकर पंपिंग चालू करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.