लोणावळा टेनिस प्रीमियर लीगमध्ये बाबा इलेव्हनला विजेतेपद

एमपीसी न्यूज –  येथील रेल्वे मैदानावर मोठ्या चुरशीने खेळल्या गेलेल्या लोणावळा टेनिस प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात स्थानिक बाबा इलेव्हन या संघाने सुनिल नाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हन संघाचा 4 गडी राखून पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.

लोणावळा टेनिस प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी झाले होते. आठवडाभर सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण 32 लीग सामने खेळविले गेले. स्पर्धेची अंतिम लढत लोणावळ्यातील बाबा इलेव्हन आणि तळेगाव येथील सुनीलनाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हन या दोन संघात झाली. बाबा इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 

निर्धारित षटकात सुनीलनाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हन या संघाला केवळ 54 या धावसंख्येवर रोखत बाबा इलेव्हन संघाने वर्चास्व मिळविले. परंतु या कमी धावसंख्येची सुरक्षा करताना सुनीलनाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हनने बाबा इलेव्हन संघाला चांगलीच लढत दिली. अखेर 4 गाडी राखून बाबा इलेव्हन संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे उपविजेतेपद सुनिलनाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हन या संघ, तृतीय स्थान रॉयल इलेव्हन या संघाने तर चतुर्थ स्थान संतोष वाघावले इलेव्हन संघाने पटकाविले.

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना विजेतेपदाचा चषक आणि रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक निखील कवीश्वर, सुधीर शिर्के, बाळासाहेब जाधव, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय गवळी, प्रमोद गायकवाड, रेल्वेचे मयूर पाडाळे, आयोजक सुरज गायखे, बंटी कदम आदींसह मान्यवर आणि क्रिकेटप्रेमी मोठ्यान संख्येने उपस्थित होते. 

स्पर्धेतील मालिकावीर हा किताब रॉयल इलेव्हनच्या रवी पंडित याला देण्यात आला. तर अंतिम सामन्यातील सामनावीर हा किताब बाबा इलेव्हनच्या संतोष सातकर याला देण्यात आला. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार सुनीलनाना भोंगाडे स्पोर्ट्स इलेव्हनच्या विकास कुमार याला तर उत्कृष्ट फलंदाजाचे पारितोषिक याच संघाच्या दत्ता पवार याला देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.