School Reopen : पहिल्याच दिवशी 95 टक्के विद्यार्थ्यांची शाळेला दांडी!

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सुमारे दीड वर्षांनी आजपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु झाले. पिंपरी-चिंचवड शहरात 8 वी ते 12 वीची 75 हजार 848 विद्यार्थीसंख्या आहे. त्यापैकी फक्त 3 हजार 621 विद्यार्थ्यांनी आज शाळेला हजेरी लावली. त्याचे प्रमाण 4.77 टक्के आहे. 95 टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारली. विद्यार्थ्याला शाळेत पाठविण्यासाठी फक्त 3 हजार 621 पालकांनी संमतीपत्र दिले. त्यामुळे पालकांमधील कोरोनाची भीती अद्यापही दूर झाली नसल्याचे दिसून येते.

शहरात महापालिका, खासगी 8 वी ते 12 वीच्या 282 शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आहेत. 75 हजार 848 विद्यार्थीसंख्या आहे. त्यात 37 हजार 411 मुले तर 38 हजार 437 मुली आहेत. त्यापैकी आज पहिल्यादिवशी 1 हजार 700 मुले तर 1 हजार 921 मुली अशा 3 हजार 621 विद्यार्थ्यांनी शाळेला हजेरी लावले. त्याचे प्रमाण अवघे 4.77 टक्के आहे. तर, 72 हजार 227 विद्यार्थ्यांनी पहिल्याचदिवशी शाळेला दांडी मारली. त्याचे प्रमाण 95 टक्के आहे. 75 हजार 848 विद्यार्थ्यांपैकी फक्त 3 हजार 621 विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र दिले आहे. त्यामुळे पालकांमध्ये कोरोनाची अद्यापही भीती दिसून येत आहे. दरम्यान, शहरातील 1 हजार 978 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला तर 3 हजार 112 शिक्षक, कर्मचा-यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत.

कोरोना संसर्गाच्या प्रार्दुभावामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणामध्ये खंड पडला. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन तो भरुन काढावा. देशाचे तुम्ही भवितव्य आहात तेव्हा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन सुरक्षित रहा असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले. महापौर ढोरे यांनी काही शाळांना भेटी दिल्या व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फुल व पेन देऊन केले.

सांगवी येथील नृसिंह हायस्कूल, पिंपळेगुरव येथील महानगरपालिका माध्यमिक शाळा चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदीर, व अजंठानगर येथील माता रमाबाई आंबेडकर प्राथमिक शाळेला त्यांनी भेट दिली. यावेळी शिक्षण मंडळ सभापती मनिषा पवार, जैव व विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या शारदा सोनवणे, योगिता नागरगोजे, स्वीकृत नगरसदस्य मोरेश्वर शेडगे, पर्यवेक्षिका अनिता जोशी, मुख्याध्यापिका अनिता रोडगे, सुनिता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, प्रमोद ठाकर आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, ”नवीन पिढीची देशाला गरज आहे. कोरोना अद्यापही संपलेला नसून तिसरी लाट येण्याची शक्यता आहे असे तज्ञांचे मत आहे. तरी विद्यार्थ्यांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंग पाळावे, सतत हात साबणाने स्वच्छ धुवावे, सर्व कोरोनाशी संबंधित शासकीय नियमांचे, सूचनांचे पालन करावे, वेळप्रसंगी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.