Bhosari: पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार हवेत – शरद पवार

विधानसभेला नवीन चेहऱ्याला संधी

एमपीसी न्यूज –लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मतदार वेगळा विचार करतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालाने खचून जाऊ नका. विधानभेच्या तयारीला लागा. विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेह-याला संधी दिली जाईल. त्यासाठी आतापासूनच मतदारांच्या घरी पोहचा. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच आमदार निवडून आले पाहिजेत. त्यासाठी प्रभावीपणे काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

तसेच आरएसएसचे लोक कसा प्रचार करतात? हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले. त्यातील एखादे घर बंद असेल. तर, ते संध्याकाळी त्या घरी जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात. पण त्या घरी जाऊनच येतात. चिकाटी सोडत नाहीत. असे शिस्तबंध काम करतात. त्यामुळे त्याचे अनुकरण करत आपण देखील अशा पद्धतीने जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले.

  • आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज (गुरुवारी) भोसरी एमआयडीसीतील हॉटेल पर्ल येथे पदाधिका-यांची बैठक घेतली. शहरातील तीनही विधानसभा मतदार संघातील निवडणूक रणनीतीवर पवार यांनी पदाधिका-यांशी संवाद साधला. सुमारे पाऊण तासाच्या भाषणात त्यांनी विविध मुद्यांचा परामर्श घेतला.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे, मयुर कलाटे, नाना लोंढे, अजित गव्हाणे, अरुण बो-हाडे, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

  • यावेळी शरद पवार म्हणाले, ”विधानसभा निवडणुकीला केवळ 98 दिवस राहिले आहेत. त्यामुळे विधानसभेची खबरदारी तातडीने घ्यायची आहे. त्यामुळे आजपासूनच कामाला लागा. सर्वांनी एकत्र बसून जबाबदारी वाटून घ्या. त्यादृष्टीने कामाला लागा. जो प्रभाग दिला आहे. त्या प्रभागातील मतदारांची यादी तुमच्याकडे असली पाहिजे. कोण घरी आहे, कोण बाहेरगावी गेले आहेत. कोणाला भेटलात कोणाला भेटला नाहीत?. त्याचे टिपण करा. प्रत्येक घरातील कुटुंबाची माहिती घ्या. प्रत्येकाला वैयक्तिक भेटा, आत्तापासूनच घरोघरी जाऊन मतदारांना भेटल्यास मतदार ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न उपस्थित करणार नाहीत. त्यामुळे या कामाची सुरुवात आजपासूनच करा. असे केल्यास निवडणुकीत यश येणे अशक्य नाही. याची अतिशय गरज आहे”.

”मतदारांना कधीच दोष द्यायचा नाही. चूक आपली असते, लोकांची नसते. लोक आपल्याला का नाकारतात? याचा विचार करा. चूक दुरुस्त करुन लोकांमध्ये जा. चुक दुरुस्त करुन लोकांमध्ये गेल्यास ते स्वीकारतात. त्यादृष्टीने प्रभावीपणे कामाला लागा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

  • ”प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रत्येक मतदारसंघात येऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील येतील. तेथील मोठ्या नेत्यांच्या भावना म्हणजे हाच अंतिम निर्णय राहणार नाही. तर, कार्यकर्ते जे सांगतील तोच अंतिम निर्णय असेल. निवडणुकीत लोकांना बदल हवा असतो.

जनसामान्यांना नवीन चेहरा हवा असतो. त्याच त्याच लोकांना संधी दिल्यास लोक कंटाळतात. कारण, तुम्हाला खूप मिळाले आहे, असा लोकांचा समज होतो. नवीन चेह-याला संधी द्यावी असे नागरिकांची भावना असते. तेच तेच लोक नकोत म्हणून विधानसभेला नवीन चेह-याला संधी देण्यात येईल. उमेदवार लवकर जाहीर करण्याची दक्षता घेण्यात येईल”, असेही शरद पवार म्हणाले.

  • ”काही वर्षांपुर्वी पिंपरी-चिंचवड म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेतले जात होते. महापालिका आपल्याकडे होती. मी देशात फिरतो. शहरातून देखील जाण्याचा प्रयत्न करतो. शहरातून अनेकदा जाणवते, पुण्यापेक्षा शहरात जास्त सुधारणा झाला आहे. रस्ते, उद्याने सुधारली आहेत. पुण्यापेक्षा पिंपरी महापालिकेचा विकास चांगला झाला. त्याचे श्रेय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे. तीनवेळा जनतेने आपल्याला महापालिकेत सत्ता दिली. मागच्या वेळेला धक्का बसला. याचे आश्चर्य वाटले’, असेही शरद पवार म्हणाले.

बाहेरील लोकांना संधी द्या; पाटीलकी आता संपली!
पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या विविध कोप-यातून लोक स्थायिक झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शहरात वास्तव्यास आहेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे पक्ष संघटनेत, निवडणुकीत त्यांना संधी देण्यात यावी. पिंपरी-चिंचवडनगरी कामगारांची नगरी आहे. त्यामुळे कामगार क्षेत्रातील लोकांना देखील संधी देण्याची सूचनाही पवार यांनी केली.

  • शिरुरच्या विजयबाद्दल पदाधिका-यांचे केले अभिनंदन!
    ऐनवेळेला घेतलेला निर्णय कधी तोट्याचा तर कधी फायद्याचा होतो. तसेच नवीन चेहरा दिल्यास लाभदायक होतो. त्याचा अनुभव शिरुर लोकसभा मतदारसंघात आला. डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जनतेला माहित नव्हते. सर्वांनी मनापासून काम केले. त्यामुळे डॉ. कोल्हे निवडून आले. भोसरीतून विरोधकांचा लीड कमी केला. सामुदाहिक प्रयत्नातून आपण काय करू शकतो हे दाखवून दिले आहे. त्यांच्या यशात फार मोटा वाटा आहे. भोसरीतून कमी पडणार याचा अंदाज होता. परंतु, तुम्ही कष्ट घेऊन त्याचे मताधिक्य कमी केले. त्यानिमित्त भोसरीतल पदाधिका-यांचे पवार यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.