Pimpri : शहरात योगप्रात्यक्षिकांद्वारे जागतिक योगदिन साजरा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा यांच्यावतीने  योग  प्रात्यक्षिकांद्वारे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.  

काकास इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी मुलांचे आनंदात गुलाबाचे फुल देऊन संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष  नवीन भगवान तापकीर, स्वीकृत नगरसेवक विनोद  तापकीर, प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर तापकीर,  अर्चना तापकीर, स्कूलचे चिप कॉडीनेटर  प्रशांत रेड्डी,  उपाध्यक्ष वंदना, चिराग फुल सुंदर गणेश भोसले आदी उपस्थित होते.

काकास इंटरनॅशनल ही पिंपरी-चिंचवड परिसरातील पहिलीच डिजिटल स्कूल आहे. काका’स इंटरनॅशनल स्कूलच्या नवीन शिक्षणप्रणालीमुळे डिजिटल शिक्षण पद्धतीने मुलांची बौद्धिक क्षमता सुधारेल  व मुलांचा शिक्षण क्षेत्राकडे किंबहुना स्कूल व शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष नवीन तापकीर यांनी सांगितले.

पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्रात येथे केंद्रीय आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार स्वस्थवृत्त व योग विभागाच्या वतीने २१ जून जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला विद्यपीठाचे कुलगुरु डॉ.  एन. जे पवार, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेद्र शर्मा, भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार पालेकर, परिचारिका महाविद्यालयांच्या प्राचार्य रुपाली साळवी, आयुर्वेद उप प्राचार्य डॉ प्रशांत खाडे, योग प्रभारी डॉ.  संतोष कांबळे, सल्लागार डॉ.  बी.पी पांडे उपस्थित होते.

या योग सत्रात विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ओंकार ध्यान, ध्यानधारणा  योगाभ्यास करण्यात आला.  या कार्यक्रमात  डॉ.  डी.  वाय. पाटील विद्यापीठ व विद्याप्रतिष्ठान सोसायटी अंतर्गत येणारे विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी योगाभ्यास सत्रात सहभागी होते. एकूण ४१० सह्भागार्थींनी लाभ घेतला. योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निबंध स्पर्धा, योग दिंडी, योगाभ्यास वर्ग, भिंती चित्र  स्पर्धा, रांगोळी, व्याख्यानमालाचे आयोजन आयुर्वेद महाविद्यालयात करण्यात आले होते.  प्रत्येक स्पर्धेतून तीन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

“आपले आरोग्य सुदृढ निरोगी राहावे आणि सर्वांचा कल योग व सूर्यनमस्काराकडे वाढावा. योग विषयी जनजागृती व्हावी तसेच प्रचार व प्रसार व्हावा” या प्रमुख उद्देशाने या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्मृतिका तावरे व आभार प्रदर्शन डॉ प्रशांत खाडे केले. संपूर्ण योगसप्ताह व योग दिनाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन योग प्रभारी डॉ संतोष कांबळे स्वस्थवृत्त विभाग यांनी केले.

आज जागतिक योग दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठाण व योग विद्या धाम नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथील विरंगुळा केंद्रामध्ये आज (शुक्रवार, दि. २१ जून) पासून पुढील एक महिन्यासाठी मोफत योग शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरासाठी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, मंगेश पाटील, प्रशांत रणखांब, प्रा. हरिनारायण शेळके, अर्चना तोडकर, सारिका रिकामे हे उपस्थित होते. या योग शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे प्रतिष्ठाणच्या वतीने सांगण्यात आले आहे.सहज योग ध्यान कार्यशाळेच्या माध्यमातून चिंचवड ईस्ट पोस्ट ऑफिस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयातील कर्मचा-यांनी योगासने केली.

स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगर व योग विद्याधाम नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिनाभर चालणाऱ्या योग शिबिराचे उदघाटन करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे व जेष्ठ निवेदक व्याख्याते राजेंद्र घावटे यांच्या हस्ते उदघाटन समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके, महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना तौदकर, पदाधिकारी सारिका रिकामे , योग प्रशिक्षक प्रशांत रणखांब आदी उपस्थित होते.

नारायण बहिरवाडे म्हणाले की, “आजच्या धकाधकीच्या आयुष्यात योगसाधनेची नितांत गरज आहे. भारताची प्राचीन परंपरा आता संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा स्वीकारली आहे. योगाचे महत्व पटल्यामुळे अनेक देशात योगाचा अभ्यास केला जातो. शरीर, मन यांच्या सुदृढतेसाठी योग अतिशय उपयुक्त आहे..मोफत असलेल्या योग शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा . आपले आयुष्य निरामय जगण्यासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार करावा. योग दिनाच्या निमित्ताने स्वतः योग शिकून इतरांनाही त्याकडे वळवणे आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे..रोजची पहाट योगसाधनेने सुरू झाल्यास दिवस चैतन्यमयी जातो.”

योग शिबिरास शिवतेजनगर, शाहूनगर, संभाजीनगरमधून मोठ्या संख्येने स्त्री पुरुष नागरिक उपस्थित होते. मोठया संख्येमुळे सकाळी एक ऐवजी दोन वर्ग सुरू करावे लागले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.