Pimpri : दोन महिलांनी चोरले तीस लाखांचे हिरे

एमपीसी न्यूज – दोन महिलांनी मिळून बंगल्यातून 30 लाख 75 हजार रुपये किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 6) सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच या कालावधीत अजमेरा मधील टेल्को ऑफिसर्स क्वार्टर्स येथे घडली.

सोनम संतोष कटारे (वय 29), प्राजक्ता उर्फ प्रज्ञा संजय लोंढे (वय 30, दोघी रा. पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजीव अशोक रोषा (वय 45) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजीव टेल्को कंपनीच्या ऑफिसर्स क्वार्टर येथे 71 क्रमांकाच्या बंगल्यात राहतात. सोनम आणि प्राजक्ता या दोन महिलांनी राजीव यांच्या बंगल्यातून मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच या कालावधीत 30 लाख 75 हजार रुपये किमतीचे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

घरफोडी करून मोबाईल चोरला

बौद्ध नगर पिंपरी येथे एका घराचा दरवाजा उचकटून घरातून 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन पळवला. याप्रकरणी सरूफोदिन चांद मोमीन (वय 36) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

केक शाॅपचे शटर उचकटून रोकड पळविली

केक शॉपचे दुकान कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील लाकडी कापडामध्ये ठेवलेली 35 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 6) पहाटे संभाजीनगर मधील माँजिनीज केक शॉपमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी निखिल बाबासाहेब वाघमारे (वय 22, रा. साने चौक, चिखली) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. निगडी पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

हिंजवडीत ऑफिस फोडले

हिंजवडी येथे मारुंजी रोडवर असलेले तृषा इंटरप्राईजेस हे ऑफिस अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि. ६) पहाटे फोडले. चोरट्यांनी ऑफिसमधील टेबलच्या ड्रॉवरमधून 55 हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी तुषार संताजी चव्हाण (वय 30, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.