Pimpri : पाहण्यासाठी दिलेली बॅट परत मागितल्यावरून तरुणास मारहाण; दोघांना अटक
एमपीसी न्यूज – पाहण्यासाठी दिलेली बॅट परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाच्या डोक्यात बॅट मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी पिंपरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
फैजल इस्माईल शेख (वय 23, रा. कासारवाडी), अविनाश सुभाष फुलवले (वय 25, रा. दिघी), दीपक मोहिते (रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुमित रामलाल गुप्ता (वय 48, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी फैजल आणि अविनाश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयासमोरील सांस्कृतिक भवन येथे क्रिकेट खेळून आल्यानंतर उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या तोंडओळखीच्या आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे बॅट पाहण्यासाठी मागितली. त्यानंतर फिर्यादी यांनी बॅट परत मागितली असता आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर फिर्यादी सुमित यांना डोक्यात बॅटने मारहाण करून गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.