एमपीसी न्यूज – कोरोना जागतिक महामारीत डिसेंबरपासून काल (बुधवार) पर्यंत जगभरात एकूण 20 हजार 599 जणांचे बळी गेले आहेत, असे वृत्त ‘एएफपी’ने उपलब्ध अधिकृत आकडेवारीच्या आधारे दिले आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे.
कोरोना जागतिक महामारी सुरू झाल्यापासून जगातील 182 देश आणि प्रदेशांमधील 4,47,030 पेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे, असे ‘एएफपी’ने म्हटले आहे. डिसेंबर महिन्यात चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणू पहिल्यांदा आढळला होता. त्यानंतर तो झपाट्याने जगभर पसरला.
जगभरातील विविध देशांकडून मिळालेली अधिकृत आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयात संकलित करण्यात येत आहे. ही आकडेवारी धक्कादायक असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना या आजाराला जागतिक महामारी म्हणून या आधीच जाहीर केले आहे.