Pimpri : स्वयंसेवी संस्था व पालिकेच्या समन्वयातून सुमारे 39 हजार लोकांना अन्नदान

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनच्या काळात शहरातील विविध भागात असणा-या भुकेल्यांना अन्नदान करण्यासाठी अनेक संघटनांचे हात पुढे येत असून या संघटनांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समन्वयातून आज शहरात विविध ठिकाणी सुमारे 39 हजार 125 व्यक्तींना अन्नवाटप केले आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बेघर, अनाथ, हातमजूर, दिव्यांग, रोजंदारीवर काम करणारे कामगार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. या उपासमार होणा-या लोकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्ती यांनी या कार्यात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले होते. या आवाहनाला अनेक संस्थानी प्रतिसाद देत गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम केले आहे.

घरात अडकून पडलेल्या ज्येष्ठांना घरपोच जेवणाचा डबा पोहोचविण्याची जबाबदारी या संस्थानी घेतली आहे. आपत्कालीन परिस्थितीत आपलेही योगदान असावे यासाठी अनेक हात पुढे सरसावले असून शहरातील विविध भागांत जाऊन फूड पॅकेट आणि अन्नवाटप करण्याचा दैनंदिन कार्यक्रम या संस्थेतील कार्यकर्त्यांनी हाती घेतला आहे.

लॉकडाऊन कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महानगरपालिकेने विशेष समन्वय कक्ष स्थापन केला आहे. विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि व्यक्तींचे जाळे उभे करुन अन्न वाटपाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात आले आहे .

यासाठी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त संदिप खोत यांच्या नियंत्रणाखाली कामकाज सुरु असून या कामात कार्यकारी अभियंत्यांच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय पातळीवर आठ विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. अन्न व शिधा वाटप करताना सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

या कार्यामध्ये विश्व हिंदू परिषद, इस्कॉन, बजरंग दल, लक्ष्य फाऊंडेशन,राकेश वार्कोडे फाऊंडेशन, समप्रिय, पीसीसीएफ, पोलिस मित्र नागरिक संघटना, अग्रसेन संघटना, शिव भोजन, संस्कार सोशल फाऊंडेशन, धर्म विकास संस्था, काळभैरवनाथ उत्सव समिती, जनकल्याण समिती आदी संस्था सहभागी झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.