Maval: नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करा – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सामान्य जनतेसाठी रेशनिंगचा धान्यपुरवठा हा गरजेचा विषय झाला आहे. या संकटाच्या काळात सामान्य जनतेची रेशन दुकानदारांकडून नफेखोरीसाठी होणा-या फसवणुकीच्या आणि पिळवणुकीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याबाबत विनाविलंब चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, त्यांचे परवाने रद्द करून महिला बचत गट, दिव्यांग व्यक्ती यांना द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे  यांना दिले. 

यावेळी संदीप काकडे (अध्यक्ष- युवा मोर्चा, भाजप),  किरण राक्षे (संघटनमंत्री- मावळ तालुका, भाजप),  सुनील चव्हाण (सरचिटणीस- मावळ तालुका, भाजप), अभिमन्यू शिंदे (अध्यक्ष- विद्यार्थी आघाडी, भाजप),  धनंजय टिळे (अध्यक्ष- पवन मावळ विभाग) आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक रेशनिंग कार्डधारकास रेशनिंग वाटपाची पावती मिळावी, प्रत्येक दुकानदारांना इलेक्ट्रीक वजन काटा वापरण्यास सक्तीचे करावे, तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांचे आधारकार्ड लिंकींग करावे, ज्या दुकानदारांच्या विरोधात तक्रारी आहेत. त्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचे परवाने रद्द करून महिला बचत गट व दिव्यांग व्यक्तींना देण्यात यावे व तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती या   निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.