Maval: बधलवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन

krushi sanjivani saptah organized by Agriculture Department at Badhalwadi taluka maval कृषी संजीवनी सप्ताह शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्यात आला.

एमपीसी न्यूज- मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने दि.1 जुलै ते 7 जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे. या कृषी संजीवनी सप्ताहात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या बांधावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

खरीप हंगामातील विविध योजना, पीक लागवड, पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करणे, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनांबाबत जनजागृती करणे व प्रसिध्दी देणे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, केंद्र व राज्य शासनाच्या कृषी व कृषी संलग्न विभागाच्या शेतक-यासाठी असलेल्या योजनांबाबत सहाय्यक कृषी अधिकारी प्रियंका पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषी संजीवनी सप्ताह शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्यात आला. यांत्रिकीकरणाने भात लागवडीचा कार्यक्रम गबाजी दहातोंडे यांच्या शेतात करण्यात आला.

दरवर्षी दि.1 जुलैला वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने प्रगतशील शेतक-यांचा सत्कार करण्यात आला. मावळचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आधुनिक पद्धतीने लागवड करावी, असे आवाहन केले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी आधुनिक लागवड पद्धती बाबत सखोल मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक डी.डी.तुपे, ‘आत्मा’चे  राहुल घोगरे, कृषी सहाय्यक अधिकारी पिरजादे, कृषीमित्र अनिल बधाले आणि ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.