Pune: महापालिकेने कोरोना प्रादुर्भाव उपाययोजना, आर्थिक स्थितीबाबत माहिती द्यावी- विशाल तांबे

गेल्या 5 महिन्यांत जवळपास 300 कोटी रुपये महानगरपालिकेने कोविड- 19 प्रादुर्भाव परिस्थितीत खर्च केलेला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या आज (दि.5) होणाऱ्या मुख्य सभेत कोरोना प्रादुर्भाव उपाययोजना, आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी मंगळवारी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मार्च महिन्यापासून आजपर्यंत जवळपास 5 महिने पुणे शहरात कोविड- 19 प्रादुर्भावाची परिस्थिती आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची मुख्य सभा 5 महिने झाली नाही. महापालिकेने उपाययोजना करूनही कोरोनाचे संकट आटोक्यात आले नाही. त्यामुळे यापुढील काळात अधिक खबरदारीने काम करावे लागणार आहे.

मागील 5 महिन्यांत कोविड- 19 परिस्थितीबाबत केलेल्या उपाययोजना, झालेला खर्च आणि इथून पुढील काळात कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना प्रशासन करणार आहे, याबाबत बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सविस्तर निवेदन करावे, असे तांबे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापौरांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली आहे. गेल्या 5 महिन्यांत जवळपास 300 कोटी रुपये महानगरपालिकेने कोविड- 19 प्रादुर्भाव परिस्थितीत खर्च केलेला आहे.

मागील आर्थिक वर्षातील विकासकामांना दिलेल्या मुदतवाढीमुळे कामांची बिले अदा करणे तूर्तास बाकी आहे. चालू वर्षाच्या कामांबाबत ठोस कोणताही निर्णय अजूनपर्यंत दिसून येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.