Wakad crime News : गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करून मोबाईल चोरट्याला पकडले
एमपीसी न्यूज – सायकल वरून जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल फोन चोरून पळून जाणाऱ्या तिघांना गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करून पकडले. एका सराईत गुन्हेगाराला अटक करून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रोहीत अनिल सकट (वय 20, रा. गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शिवानंद राजनेत मौर्या (वय 21, रा.विकासनगर, देहूरोड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मौर्या सोमवारी रात्री साडेनऊ वाजता पिंपळे सौदागर येथील गिरणी बंद करून सायकल वरून घरी जात होते.
औंध रावेत बीआरटी रोड, ताथवडे येथे त्यांच्या मागून दुचाकीवरून (एम एच 14 / एच ई 5787) तिघेजण आले. त्यांनी मौर्या यांना धक्का मारून थांबवून 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला.
मोबाईल चोरून नेल्यावर मौर्या यांनी मोठमोठ्याने आरडा ओरडा केला. त्यावेळी गस्तीवरील पोलीस शिपाई सचिन जगताप, पोलीस नाईक गणेश गिलबिले, पोलीस नाईक सतिश गायकवाड यांनी वेगवेगळया दुचाकीवरुन आरोपीचा पाठलाग केला. तिघांना दुचाकीसह पोलिसांनी ताब्यात घेतले.
दोघेजण अल्पवयीन आहेत. तर आरोपी रोहित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत.