Pimpri News: कोरोना कोविड सेंटर बंद असतानाही बिले अदागीचा घाट, प्रभारींचा ‘अतिरेक’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेले कोविड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही या संस्थांच्या बिलांच्या अदागीचा घाट घालण्यात आला आहे. यासाठी काही राजकीय पदाधिकारी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी ‘नामसाधर्म्य’ असलेल्या प्रभारी अधिकाऱ्याचे प्रयत्न सुरु आहेत. कारण, त्यातून त्यांची टक्केवारी ठरली असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

शहरात कोरोनाने उद्रेक केल्यानंतर लक्षणे नसलेले रुग्ण, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, गंभीर रुग्ण, हायरिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेले नागरिक या सर्वांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांबरोबरच खासगी कोरोना केअर सेंटरची उभारण्यात आले होते. यामध्ये 23 कोरोना केअर सेंटर खासगी पद्धतीने सुरू करण्यात आले होते.

15 ऑक्टोबर 2020 रोजी अनेक खासगी कोविड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश पारित करण्यात आले होते. असे असताना देखील या संस्थांना त्यानंतर देखील बिले अदागीचा घाट घालण्यात आलेला आहे. तीन कॅटेगरीमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरचे बिल अदा करण्याकरिता पद्धत निश्चित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली होती.

अनेक कोविड केअर सेंटर बंद असतानाही त्यांना बीले अदा करण्याचा घाट घातला जात आहे. स्थायी समितीने ती बीले मंजुर करावीत यासाठी राजकीय पदाधिकारी, वैद्यकीय विभागातील एक अधिकारी आणि उपमुख्यमंत्र्यांशी ‘नामसाधर्म्य’ असलेल्या प्रभारी अधिकाऱ्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातून त्यांची टक्केवारी ठरली असल्याचा आरोप होत आहे. कोरोना महामारीत असा भ्रष्टाचार करुन अधिकारी आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करत आहेत. यावरुन नागरिक संताप व्यक्त करत आहेत. यामध्ये आयुक्तांनी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर किती संस्था चालकांनी बंद कालावधीमध्ये बिलांची अदायगी करण्याबाबत मागणी केली आहे. त्यांची यादी मिळावी किंवा त्यांनी केलेल्या अर्जाची प्रत मिळावी, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.