Pune News : मध्यरात्री किरण गोसावीला पुणे पोलिसांनी पकडले
एमपीसी न्यूज : आर्यन खान सोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी पकडले. किरण गोसावी विरोधात पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 2019 साली त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. आर्यन खान प्रकरणात पुन्हा त्याचे नाव आल्याने पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. तेव्हापासून तो पोलिसांना चकवा देत फिरत होता. अखेर बुधवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
एन सी बी ने आर्यन खानला ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक केली तेव्हा किरण गोसावी त्या ठिकाणी पंच म्हणून हजर होता. सुरुवातीला तो एनसीबीचा अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु एनसीबीने स्पष्टीकरण दिल्यानंतर तो फरार झाला होता. पुणे पोलीसही त्याच्या मागावर होते. सत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. वेगवेगळ्या राज्यात जाऊन त्याचा शोध घेतला जात होता. परंतु तो पोलिसांना चकवा देत फिरत होता.
अखेर बुधवारी मध्यरात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले. पोलीस आयुक्त सकाळी 11 वाजता या संदर्भातली अधिक माहिती पत्रकार परिषदेत देणार आहेत.