Pune News : आयुक्तांच्या नावाचा बनावट चेक वटण्यासाठी आलेली सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : पुण्यातील सहकारनगर पोलिसांनी गुन्हेगारांची एक सराईत टोळी गजाआड केली. या टोळीने आगरतळा महानगरपालिका आयुक्तांच्या नावाचा बनावट चेक तयार करून त्याद्वारे पुण्यातील एका बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी यवतमाळमधील एका बँकेतून देखील अशा प्रकारे 28 लाख रुपये काढल्याचे समोर आले आहे.

विश्वनाथ आनंद किरतावडे (48, धनकवडी), सुदेश मधुकर आव्हाड (58, कोंढवा), सागर प्रेमचंद पारख (38, येरवडा), श्रवण मल्लय्या तागलापोल्ली (28, चंद्रपूर) , विकास मुनलाल यादव (30, गोंदिया) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बँकेच्या शाखा प्रबांधक यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सातारा रस्त्यावरील एका नामांकित बँकेत आगरतळा महापालिका आयुक्तांच्या नावाचा बनावट चेक वटवन्यास एकजण येणार असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून किरतावडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत  इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत सर्वांना अटक केली.

या सर्व आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खात्यातून 28 लाख रुपये काढल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिसांनी तपास केला असता श्रवण आणि विकास यांच्यावार चंदिगढ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.