Ind Vs NZ: उत्कंठावर्धक सामन्यात न्यूझीलंड संघाने झुंजार खेळ करत सामना ठेवला अनिर्णित

भारतीय संघाला छळले शेवटच्या नाबाद भागीदारीने.

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी)
अतिशय रोमहर्षक ठरलेल्या शेवटच्या सत्रात कसोटी विश्व कप जिंकलेल्या न्यूझीलंड संघाने आज भारतात भारतीय फिरकीविरुद्ध शेवटच्या डावात तेही पाचव्या दिवशी झुंजार खेळ करत पराभवाच्या गर्तेत असतानाही ज्या खिलाडूवृत्तीसाठी त्यांना जगभर नावाजले जाते त्याच खिलाडूवृतीने कुठलेही खोटे नाटे अपील न करता जबरदस्त आणि आश्वासक फलंदाजी करत भारताच्या हातातोंडातील विजयाला परत खेचत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले.

शेवटच्या गड्याने तब्बल 54 चेंडू खेळून काढत भारतीय फिरकीला नामोहरम करून सामना अनिर्णित राखत एकप्रकारे नैतिक विजय सुद्धा प्राप्त केला आहे, दोन्ही संघाचे खेळ बघता म्हणूनच या सामन्यात क्रिकेटचा विजय झाला आहे असे म्हटले तर ते अजिबातही गैर ठरणार नाही.

अंधुक प्रकाशाचे अपील न करणे,खेळ सुरू असताना उगाचच वेळ वाया न घालवणे या खऱ्याखुऱ्या खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन पाहुन भारतात सामना असताना सुद्धा खऱ्या क्रिकेटप्रेमी आणि रसिक भारतीय प्रेक्षकांनी म्हणूनच किवी संघाने सामना अनिर्णित ठेवल्यावर त्यांची मनापासून प्रशंसा करत मनमोकळी दाद ही दिली.

आज पाहुण्या संघाने सकाळी कालच्या एक बाद चार वरून पुढे खेळ सुरू करताना उपहारापर्यंत भारतीय गोलंदाजीचा आत्मविश्वासाने सामना करत एकही विकेट जावू दिली नाही. सलामीवीर टॉम लाथामला कालचा रात्रीचा रखवालदार समरविलने छान साथ देत आपल्या संघाला सामना किमान हरणार नाहीत ही खात्री वाटेल असा खेळ केला ,ही जोडी खूप चिवट प्रतिकार करायला लागली होती, अखेर 76 धावांची भागीदारी झाल्यानंतर जलदगती गोलंदाज उमेश यादवने समरविलला बाद करत ही जोडी फोडली आणि आजच्या दिवसातले पहिले यश भारताला मिळवून दिले.दुसऱ्या बाजूने टॉम लाथाम सुद्धा आपल्या संपूर्ण भरात आहे असे वाटावे असा खेळ करत होता, बघताबघता त्याने दुसऱ्या डावात सुद्धा अर्धशतकी खेळी पूर्ण करत दोन्हीही डावात अर्धशतकी खेळी करण्यात यश मिळवले.

कर्णधार विलीएम्सन सोबत 39 धावांची बहुमूल्य भागीदारी केल्यानंतर तो वैयक्तिक 52 धावांवर आश्विनच्या एका अप्रतिम फिरकीवर त्रिफळा बाद झाला आणि भारतीय संघात उत्साह संचारला.त्यामुळे अवघ्या तीस धावांच्या बदल्यात पाहुण्या संघाच्या आठ विकेट्स तंबूत परतल्या होत्या आणि जवळपास पंधराहुन अधिक षटकाचा खेळ बाकी असल्याने भारतीय संघ विजयाच्या अगदी समीप आहे असे वाटू लागले होते, पण आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात खेळत असलेल्या रचीन रविंद्रनने जबरदस्त घोरपडीसारखा चिवटपणा दाखवत जवळपास 90 चेंडचा सामना करताना आपली विकेट राखून ठेवल्याने भारतीय गोलंदाजाना आणि रसिकांना सुद्धा निराश व्हावे लागले.

जे काम कर्णधार केन,वा रॉस टेलर या महान फलंदाज करू शकले नाहीत ते मोठे काम नवख्या रचीनने करून दाखवले, म्हणूनच सामना अनिर्णित झालेला पाहुणा भारतीय क्रिकेट संघाचा कोच राहुल द्रविडने सुद्धा त्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले.रचीनला आधी जेमिसनने व शेवटीशेवटी एजाज पटेलने मोलाची साथ दिल्याने भारतीय संघाच्या विजयाच्या मनसुब्यावर अखेर पाणी पडले.आणि निर्धारित षटके पूर्ण झाल्यावर अतिरिक्त पंधरा मिनिटाच्या खेळाला अंधुक प्रकाशामुळें तिलांजली द्यावी लागण्याने पंच नितिन मेनन यांनी दोन्ही संघाला सामना थांबण्याची सूचना केली,आणि अखेर या उत्कंठानाट्याचा शेवट झाला.

भारतीय संघाकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक चार तर रवी अश्विनने तीन बळी घेतले,अक्षर पटेल व उमेश यादवने एकेक गडी बाद केला,पण या सर्वाना नवोदित रवींद्रन पुरून उरला आणि त्याने भारतीय संघाला एकट्याने नामोहरम करत आपल्या संघासाठी बहुमूल्य आणि एक अविस्मरणीय खेळी केली,त्याचे विशेष कौतुक फक्त याचसाठी की तो काही प्रतीथियस फलंदाज म्हणून कोणालाही परिचित नव्हता, आणि ज्या गोलंदाजीसमोर केन विलीएम्सन,रॉस टेलर,टॉम लथम असे दिग्गज फलंदाज लढू शकले नाहीत तिथे हा नवखा पोरगा लढला,नुसतेच लढला नाही तर त्याने आपल्या संघाचा पराभव सुद्धा टाळला.
भारतीय संघाला सुद्धा या सामन्यातल्या निकालाने बरेच काही धडे दिले आहेत,मधल्या फळीतले अपयश, सलामी जोडीचे नाकर्तेपण ,त्यातच काल कदाचित डाव घोषित करण्यात झालेला विलंब या सर्व गोष्टीमुळे त्यांना हातातोंडाशी आलेला विजय गमवावा लागला.अर्थात विराट,रोहित, राहुल,बुमराह, शमी,पंत यांच्या अनुपस्थितला हा सामना जवळजवळ विजयासमीप आल्याने काही दोषाकडे डोळेझाक होवू शकते.
एकंदरीतच मैदानावर उपस्थित असलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना खूप दिवसांनी एक रोमहर्षक कसोटी सामना प्रत्यक्ष बघायला तर असंख्य रसिकांना थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अनुभवता आल्याचे मोठे समाधान नक्कीच असेल.आर अश्विनने आज हरभजन सिंगच्या 417 विकेट्सचा विक्रम मोडून या यादीत आपले नाव तिसऱ्या क्रमांकावर नोंदवले आहे,तर आपल्या पहिल्याच कसोटीवर आपल्या जबरदस्त खेळाने छाप पाडणाऱ्या श्रेयस अय्यरला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.
या दोन्ही संघामधील दुसरा आणि अंतिम सामना येत्या तीन डिसेंबर ला मुंबईत होणार आहे,त्यात जो संघ जिंकेल तो मालिकाही जिंकेल, न्यूझीलंड संघाने भारतात तब्बल तीन वर्षानंतर सामना अनिर्णित ठेवणारा एकमेव संघ हा आगळावेगळा बहुमानही या सामन्यात नोंदवला आहे.येत्या सामन्यात विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय संघ नव्या जोमाने लढून मायदेशातल्या आपल्या विजयी कामगीरीला कायम ठेवेल ,इतकीच अपेक्षा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.