Pune : महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जवाब दो’ आंदोलन

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यातील अनेक भागात महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत भाजप सरकारच्या विरोधात मौनव्रत धारण करत तोंडाला काळ्या पाट्या बांधून जवाब दो आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यात देखील पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

“सरकारमधील जबाबदार व्यक्ती महिलांना उचलून नेण्याची भाषा करतो तेव्हा सरकारकडून विशेषतः गृहमंत्रालयाने महिलांच्या सुरक्षेततेवर काही तरी बोलावं अशी अपेक्षा होती.तसे कुठलही विधान आलेल नाही.त्यामुळे सध्या देशात जो कारभार सुरू आहे, त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रचंड असंतोष आहे” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. पुण्यातील कालवा फुटी प्रकरणी जबाबदारी न घेता सत्ताधारी दुसऱ्यावर जबाबदारी ढकलुन देत आहेत. असा आरोप सुद्धा सुळे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभार करावा

भिडे गुरुजी यांच्यावरील गुन्हे मागे घेतले यावर बोलताना सरकार ज्यांच्यावर आरोप नाहीत त्यांना नजरकैदेत ठेवतात आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मोकाट ठेवतात.हे सातत्याने आपण राज्यात पाहतोय हे दुदैव आहे. मुख्यमंत्र्यांचा आवडता शब्द आहे पारदर्शकता. तर मग मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभार करावा असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

तोकड्या कपड्यावरून 21 व्या शतकात चर्चा करतोय हे दुर्दैव

” कोल्हापूरच्या अंबामाता मंदिरात तोकड्या कपडे घालून प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. याबाबत आपण २१व्या शतकात ही चर्चा करतोय दुर्दैव आहे. महिला सबलीकरण, अत्याचार, घरगुती हिंसाचार यासारखे अनेक मोठे प्रश्न देशात आहेत. देवस्थान समितीनेही यावर खुलासा केला आहे. त्यामुळे आपणही या वादावर पडदा टाकून देशातील इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करायला हवी, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.