Maval / Shirur : प्रचाराचा सुपर संडे !

निवडणुकीच्या धामधुमीतील शेवटचा रविवार

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी आजच्या प्रचाराच्या शेवटच्या रविवारच्या सुट्टीचे  निमित्त साधत जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यावर भर दिला. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात तर महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पनवेल, उरण परिसरात प्रचार करण्यावर भर दिला. 

मावळ लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील शेवटच्या चौथ्या टप्यात म्हणजे पुढील सोमवारी (दि. 29)मतदान होणार आहे. शनिवारी (दि.27)प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी केवळ पाच दिवस राहिले आहेत.  लोकसभा मतदारसंघ मोठा असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे. शेवटच्या दिवसात  प्रचाराला झाडून सगळे नेते  उतरणार आहेत. प्रचारफेरी, रॅली काढण्याचे नियोजन केले जात आहे.  शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे. येत्या आठवड्यात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पिंपरी-चिंचवड शहरात प्रचार केला. नवी सांगवी परिसरात भव्य दुचाकी रॅली काढली. रॅलीमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पिंपळेगुरव, पिंपळेसौदार परिसरात नागरिकांच्या भेटी-गाठी घेतल्या. नगरसेवकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. यामध्ये भाजप शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप सहभागी झाले होते. टाटा मोटर्समधील कामगारांशी चर्चा केली. कामगारांनी बारणे यांना शुभेच्छा देत पाठिंबा जाहीर केला.

मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी उरण, पनवेल परिसरात प्रचार केला. खारघरमधील सेंट्रल पार्कमध्ये पार्थ पवार सकाळी गेले. रविवार सुटीचा दिवस असल्याने पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला आलेल्या मतदारांशी पार्थ यांनी संवाद साधला. दिवसभर मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी खेड तालुक्यात प्रचार केला. संपूर्ण तालुक्यात झंझावती प्रचार करत खेड तालुका पिंजून काढला.  नागरिकांची भेटी-गाठी घेतल्या. प्रचारफेरी काढली.   तर, शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांनी हडपसर परिसरात प्रचार केला. मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.