Pimpri News : कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचा अपघात; चालक जखमी

एमपीसी न्यूज – रस्त्यावर थांबलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना एका रिक्षाचा अपघात झाला. ही घटना शनिवारी (दि. 15) दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास पिंपरी येथे घडली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी मार्केट परिसरात रस्त्यावर एक कुत्रा थांबला होता. त्यावेळी एक रिक्षा आली असता रिक्षाला पाहून कुत्रा पुन्हा रस्त्याच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे कुत्र्याला धडक बसून अपघात होऊ नये यासाठी रिक्षा चालकाने कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.

रिक्षाचा वेग जास्त असल्याने रिक्षा रस्त्याच्या दुभाजकावर आदळली आणि दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. दरम्यान रिक्षातून चालक खाली पडला. त्यात तो जखमी झाला. त्याच वेळी चालक नसलेली चालू रिक्षा थांबवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दोन तरुणांनी रिक्षाकडे धाव घेतली. त्या दोन तरुणांनी चालती रिक्षा थांबवली. यामुळे आणखी अपघाताचा धोका टळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.