Aditi Tatkare : तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन स्थळ म्हणूनही देहूचा विकास करणार – आदिती तटकरे 

श्रीक्षेत्र देहू येथे 8.55 कोटींच्या विकासकामांचे आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज  – आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असलेल्या श्रीक्षेत्र देहूगावच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन स्थळ विकासाकरिता देहूगावला विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. 

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यानंतर महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या आठ कोटी 55 लाख रुपये निधीमधून श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतीच्या हद्दीत होणार असलेल्या विविध विकासकामांचे भूमीपूजन राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

भूमिपूजनाच्या वेळी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे,  नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, महिला शहराध्यक्षा रेश्मा मोरे, माजी सभापती हेमलता काळोखे तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी, कार्यकर्ते  व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिती तटकरे म्हणाल्या की, संतांची भूमी असलेल्या मावळ तालुक्याला  सुनिल शेळके यांच्या रूपाने तरुण व धडाडीचा आमदार मिळाला आहे. मावळच्या विकासाची तळमळ आणि  त्यांचा पाठपुरावा अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. अशा या तरुण नेत्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच संपूर्ण शासनाचे पूर्ण पाठबळ आहे. आमदार शेळके यांचे मावळच्या विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी यापुढेही त्यांना अशीच साथ द्यावी.

सन 2020-21 महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान आणि नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे योजनेअंतर्गत महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून देहूमधील या विकासकामांना सुमारे 8 कोटी 55 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.

नगरपंचायत निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादीला साथ देण्याची विनंती देहूकरांना केली होती. त्यास प्रतिसाद देत देहूकरांनी भरभरून मतदानरुपी आशीर्वाद देऊन एकहाती सत्ता दिली.देहू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या विकासकामांचे फक्त भूमिपूजन न करता प्रत्यक्ष कामांना देखील सुरुवात होणार आहे.व पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यावर भर असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नगरसेविका मीना कुऱ्हाडे, पूजा दिवटे, शीतल हगवणे, प्रियांका मोरे, सपना मोरे, पूनम काळोखे, ज्योती टिळेकर, पौर्णिमा परदेशी, नगरसेवक योगेश  परंडवाल, सुधीर काळोखे, योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, मयूर शिवशरण, मयूर टिळेकर, आनंदा काळोखे, रोहित काळोखे, कांतीलाल काळोखे, बाळासाहेब काळोखे, प्रवीण झेंडे, वैशाली टिळेकर, आदी मान्यवर, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.