MI vs SRH : मुंबई इंडियन्सला तीन धावांनी पराभूत करत सनरायजर्स हैदराबादने मिळवला रोमहर्षक विजय

(विवेक कुलकर्णी) : सलग पाच पराभवाला सामोरे गेल्यानंतर केन विल्यमसनच्या सनरायजर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरात केवळ तीन धावांनी मात दिली आणि आपल्या पराभवाची मालिकाही खंडीत केली आहे.

या विजयाने हैदराबाद संघाचे आव्हानही शाबूत राहिले असून येत्या 22 मे ला त्यांचा अंतीम सामना पंजाब किंग्ज विरुद्ध  होणार आहे. ज्यात त्यांना विजय मिळवून अंतिम चार संघात नशीबाने साथ दिली तरच स्थान मिळू शकते. टीम डेविड,रोहीत आणि ईशान किशनची झुंजार फलंदाजी मुंबई संघासाठी तर उमरान मलिक, भुवनेश्वरची अप्रतिम गोलंदाजी हैदराबाद संघाच्या विजयातले मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे.

मुंबईसाठी फक्त आत्मसन्मान राखण्यासाठीची तर सलग पाच विजयानंतर सलग तितकेच पराभव खाणाऱ्या हैदराबादसाठी अस्तित्वाची लढाई असणाऱ्या आजच्या टाटा आयपीएल 2022 मधल्या 65 व्या सामन्याला मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरुवात झाली. ज्यात रोहीत शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबाद संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले खरे पण केन विल्यमसनच्या हैदराबाद संघाने आपल्या निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 193 धावा करत  मुंबई इंडियन्स पुढे चांगले आव्हान उभे करत हा निर्णय चुकला की काय अशी शंका वाटावी अशी परिस्थिती निर्माण केली.

खरे तर सनरायजर्स हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती, चांगल्या फॉर्मात असलेल्या अभिषेकला तो फॉर्म आज तरी ना स्वतःसाठी ना संघासाठी कामाला  आणता आला नाही. संघाची धावसंख्या फक्त 18 आणि स्वतःची 9 असताना तो डॅनियल सॅम्सची शिकार ठरला. यानंतर मात्र प्रियम गर्ग आणि राहुल त्रिपाठीने दुसऱ्या गड्यासाठी 78 धावांची भागीदारी करुन संघाला मोठ्या धावसंख्येची आस दाखवली. मात्र 42 धावांवर असताना प्रियम गर्ग रमनदीप सिंगच्या गोलंदाजीवर त्याच्याच हातात झेल देवून तंबूत परतला. यावेळी हैदराबाद संघाची धावसंख्या 10 व्या षटकात 2 बाद 96 अशी होती.

यानंतर आलेल्या निकोलस पुरननेही त्रिपाठीला उत्तम साथ देत डाव पुढे नेताना तिसऱ्या  गड्यासाठी आणखी एक अर्धशतकी भागीदारी केली,या जोडीने 78 धावांची वेगवान भागीदारी जोडली आणि हैदराबाद संघ मुंबई इंडियन्स पुढे मोठे आव्हान नक्कीच उभे करणार याचे संकेतही दिले.

याचदरम्यान राहूल त्रिपाठीने आपले आणखी एक आयपीएल अर्धशतक पूर्ण करत संघासाठी एक मौल्यवान खेळीही केली.दोघेही चांगले खेळत आहेत असे वाटत असतानाच आधी पुरन 38 धावा करून मेर्डीथच्या गोलंदाजीवर बाद झाला,तर   यानंतर अगदी थोड्याच वेळात राहुल त्रिपाठीही 44 चेंडूत 76 धावा काढून रमनदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या जीवात जीव आला.

मात्र तरीही हैदराबाद संघाला केन विल्यमसनने सुंदरच्या जोडीने 193 धावांची चांगली धावसंख्या गाठून दिलीच,एकवेळ 200 ते 210 च्या आसपास जाईल असे वाटत असलेल्या सनरायजर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सने 193 धावात रोखू चांगली कामगिरी केली,रमनदीप सिंगने 3 गडी बाद करत यात मोठा वाटा उचलला.

उत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्स कडून रोहीत आणि ईशान किशनने शानदार सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या पॉवरप्ले मधल्या सहा षटकात नाबाद 51 धावा ठोकत आम्ही हे आव्हान स्विकारले आहे असाच संदेश हैदराबाद संघाला दिला. दोघेही फलंदाज आज जोशात दिसत होते. मुंबई इंडियन्सला आता हार वा जीतने काहीही फरक पडणार नसला तरी त्यांच्यासाठी आत्मसन्मान महत्वाचा होता आणि तो विजय मिळाल्यानेच द्विगुणित होणार होता.

आज या दोन्ही आक्रमक फलंदाजांची देहबोली बघता मुंबई इंडियन्सने हे आव्हान स्वीकारले आहे हे पटण्यासारखी सुरुवात करुन दिली. मात्र 95 धावांची भागीदारी झालेली असताना 48 धावा करुन रोहीत शर्मा सुंदरच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग  फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. रोहित पुढे सरसावत फटका मारणार हे लक्षात येताच सुंदरने चेंडूची गती कमी केली आणि जम बसलेल्या रोहीतच्या सुंदर खेळीचा अंत झाला.

ही पहिलीच आयपीएल आहे ज्यात महान कर्णधार आणि महान खेळाडू म्हणून ओळखला जाणारा रोहित एकही अर्धशतक वा शतक पूर्ण करु शकला नाही. आज तो ही कमी भरुन काढेल असे वाटत असतानाच सुंदरने त्याचा खेळ खल्लास करत हैदराबाद संघाच्या गोटात आनंद निर्माण करुन दिला. रोहीतने चार षटकार आणि 2 चौकार मारत केवळ 36 चेंडूत 48 धावा केल्या. तो बाद झाल्याच्या धक्क्यातून सावरण्याआधीच ईशान किशनही उमरान मलिकच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि मुंबई संघ चांगल्या स्थितीतून एकदम अडचणीत आला.

किशनने 34 चेंडूत 5 चौकार आणि एक षटकार मारत  43 धावा केल्या. पण हे दोघेही जम बसलेले असताना चुकीचा फटका मारुन बाद झाले आणि मुंबई इंडियन्स चांगलाच अडचणीत आला. यावेळी मुंबईला 48 चेंडूत 92 धावा करायच्या होत्या आणि त्यांचे अद्यापही 8 गडी बाकी होते. डॅनियल सॅम्स आणि युवा तिलक वर्माने पुढे खेळताना  फक्त 22 धावा जोडल्या असतानाच उमरान मलिकने एका वेगवान चेंडूवर तिलक वर्माला चकवले आणि तो केन विल्यमसनच्या हातात सोपा झेल देवून बाद झाला.

टी-20 मध्ये एक खराब वा एक चांगले षटक  सामन्याचा निर्णय बदलू शकते असे नेहमीच म्हटले जाते. त्याचाच प्रत्यय आज येतो की काय असे मुंबईची जोरदार सुरुवात आणि त्यानंतर पडलेल्या तीन विकेट्स बघून वाटायला लागले होते.आणि यास बळकटी तेंव्हा आली जेंव्हा उमरान मलिकने  वर्मा पाठोपाठ याच षटकात सॅम्सलाही बाद केले.यावेळी मुंबई इंडियन्सची धावसंख्या 15 व्या षटकात 4 बाद 127 अशी झाली होती.

खरेतर 10.3 षटकात नाबाद 95 अशा शानदार सुरुवातीनतंर मुंबईचा डाव अचानक गडगडला.यानंतर टीम डेविड आणि ट्रिस्टन स्टब्सने डाव पुढे चालू ठेवला. यावेळी मुंबई इंडियन्सला अखेरच्या 4 षटकात 54 धावा हव्या होत्या.यावेळी सामना हैदराबादच्या बाजूने झुकला आहे असे वाटत होते,मात्र टीम डेविडने घणाघाती फलंदाजी करायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा सामना रंगतदार अवस्थेत आला. टीमने केवळ 18 चेंडूत 46 धावा करुन वानखेडेवर एकच हंगामा केला. त्याच्या या तडाख्यात नटराजनची पुरती वाताहत झाली.

त्याला चार षटकार मारत टीम डेविडने सामना मुंबईच्या बाजूने झुकवलाय असे वाटत असतानाच नटराजनच्या त्या महागड्या षटकात स्वतःकडे स्ट्राईक घेण्याच्या नादात हो ना हो ना करता टीम डेविड नटराजच्या हातूनच धावबाद झाला आणि मुंबईचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला. त्यानंतर भुवनेश्वरने चक्क 19 वे सजतक5 निर्धाव टाकत सामना पूर्णपणे हैदराबादच्या बाजूला झुकवला. अखेरच्या षटकात 18 धावा हव्या होत्या. त्या करायची जबाबदारी बुमराह आणि रमनदीप वर तर त्या रोखायची जबाबदारी फारुकीवर होती. ती त्याने चोख पार पाडली आणि आपल्या संघाला  3 धावांनी एक महत्वपूर्ण विजय मिळवून देताना आपल्या प्ले ऑफची धुकधूक अद्यापही जिवंत ठेवली.

तर या पराभवाने मुंबईची सुरुवात आणि शेवटही निराशाजनक झाला आहे. हा मोसम मुंबई इंडियन्स कधीही लक्षात ठेवणार नाही, हे नक्की. पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला या मोसमात शेवटच्या स्थानावर रहावे लागले आहे.

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद
6 बाद 193
राहुल त्रिपाठी 76,प्रियम गर्ग 42,पुरन 38
रमनदीप सिंग 20/3,सॅम्स 39/1,मेर्डीथ 44/1,बुमराह 32/1
विजयी विरुद्ध

मुंबई इंडियन्स
190/7
रोहीत 48,ईशान 43,टीम डेविड 46,रमनदीप नाबाद 14
उमरान मलिक 23/3,भूवनेश्वर 26/1,सुंदर 36/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.