Pimpri News : नेहरूनगर जम्बो कोविड सेंटरमध्ये आणखी एक चोरीचा प्रकार उघड

एमपीसी न्यूज – नेहरूनगर पिंपरी येथील जम्बो कोविड सेंटरमधून कोरोना बधित रुग्णांचा मौल्यवान ऐवज चोरीला जाण्याचे प्रकार वाढत आहेत. या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका महिलेच्या अंगावरील 40 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार रविवारी (दि. 9) उघडकीस आला आहे.

रणवीर जवाहर ठाकूर (वय 33, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईला कोविडची बाधा झाल्याने त्यांना नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान फिर्यादी यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर आईचा मृतदेह फिर्यादी यांच्या ताब्यात दिला असता आईच्या अंगावर असलेले 18 ग्रॅम वाजनाचे 40 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

मध्यंतरी याच जम्बो कोविड सेंटरमधून दोन मयत रुग्णांचा मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर पुन्हा असाच प्रकार समोर आला आहे. उपचार घेत असलेल्या अंत्यवस्थ रुग्णांना लुटणारे हे चोरटे कोण याचा पोलीस शोध घेत आहेत.

कोविड सेंटरमध्ये सर्वसामान्य नागरिकांना जाण्यास बंदी आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये काम करणारे अथवा चोरीच्या उद्देशाने बाहेरून जाणारे चोरटे हा प्रकार करत आहेत, याबद्दल संशय आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.