Pune News : तब्बल 200 विद्यार्थ्यांनी मराठी सुलेखन करीत व्यक्त केले अक्षरांवरील प्रेम

एमपीसी न्यूज – सुंदर अक्षर हाच खरा दागिना…एकी हेच बळ… माझे माझ्या अक्षरावर प्रेम आहे… असे सुविचार कागदावर सुलेखनाद्वारे लिहित एकाच वेळी 200 विद्यार्थ्यांनी अक्षरावरील प्रेम व्यक्त केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठीत सुंदर हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत असतानाच साहित्यिकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मराठीचे महत्त्व उपस्थितांसमोर उलगडले.

अक्षर रसिक सुलेखन वर्ग आणि व्हिनस ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. पुण्यातील 25 शाळांमधून इयत्ता 3री ते 8वी पर्यंतचे तब्बल 15 हजारहून अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत प्रातिनिधीक स्वरुपात सुमारे 200 विद्यार्थी एकाच वेळी सुलेखन केले. यावेळी अक्षर रसिक सुलेखन वर्गाचे शैलेश जोशी, व्हिनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदांनी, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ आदी उपस्थित होते.

नवीन मराठी शाळेत साहित्यिक आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, वि.स.खांडेकर, विं.दा.करंदीकर, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, शांता शेळके, इंदिरा संत, दुर्गा भागवत, मंगेश पाडगावकर, विश्वास पाटील, रणजित देसाई, अरुणा ढेरे आदींच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले.

स्पर्धेत 16 मराठी माध्यमाच्या शाळा तर 9 इंग्लिश माध्यमाच्या शाळा सहभागी झाल्या. गेली 47 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात नाव मिळवलेले व्हीनस ट्रेडर्स आणि 25 वर्षांपासून सुलेखन क्षेत्रात अलौकिकपणे नाव मिळवलेले अक्षर रसिक सुलेखन वर्ग हे मराठी लेखन वृद्धीच्या दृष्टीने स्पर्धेद्वारे प्रयत्न करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.