Pimpri : मस्ती की पाठशालामधील बाप्पा देतोय पर्यावरण रक्षणाचा संदेश

एमपीसी न्यूज – रावेत येथे कामगारांच्या मुलांसाठी चालणा-या मस्ती की पाठशाळा या शाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा घेण्यात आली. या शाळेत लहान मुलांनी शाडूच्या मातीच्या सुरेख गणेश मूर्ती बनवल्या. जणू काही स्वतः बाप्पाच या चिमुकल्यांच्या हातातून आकार घेत होते.

32 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणपती हे विद्येचे, कलेचे दैवत. भारतीय संस्‍कृतीत गणपती बाप्पांना आद्य देवतेचा मान. त्‍यामुळे कोणत्‍याही शुभारंभावेळी प्रथम गजाननाचे पूजन करूनच पुढील कार्याला सुरूवात होते. त्‍यामुळे गणपती या देवतेला भारतीय संस्‍कृतीत मानाचे स्‍थान आहे. त्‍यात गणपती हे विद्येचे, बुद्धीचे दैवत असल्‍याने लहानांपासून मोठ्‍यांपर्यंत सर्वांचेच आवडते दैवत. या आवडत्या दैवताचे रूप आपल्या हातूनही रेखाटावे ही इच्छा मनात बाळगून रावेत येथील मस्ती की पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी बाप्पांची इको फ्रेंण्डली मूर्ती साकारून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.

यंदाच्या वर्षी त्यांनी गौरी गणपतीसाठी देखाव्यात इकोफ्रेंडली वस्तूंचा तसेच शाडू मातीपासून तयार करण्यात आलेल्या बाल गोपाळांची छबी असलेल्या गणेश मूर्तींचा समावेश करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. प्रदूषणाची वाढणारी पातळी आणि प्लास्टिकबंदी या दोन संकल्पनांचा मोह अनेकांना आवरलेला नसल्याने प्लास्टिकचा वापर टाळा हाच संदेश यावर्षीच्या कृतीतून दिला आहे.

कामगारांच्या मुलांसाठी मस्के वस्ती रावेत येथे चालविल्या जाणा-या मस्ती की पाठशाला येथे पर्यावरणपूरक गणपती बसवला. शाडू मातीपासून मुलांनी विविध प्रकारचे गणपती बनवले व तेच पूजण्यात आले. त्यासाठी प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, रोशनी राय, गार्गी नाटेकर, अर्चना राऊत यांनी मार्गदर्शन केले.

याबाबत सांगताना प्राजक्ता रुद्रवार म्हणाल्या की, सहगामी फाऊंडेशन व रॉबिनहूड आर्मी या संस्थेच्या पुढाकाराने मस्केवस्ती, रावेत येथे कामगाराच्या मुलांसाठी व महिलांसाठी पाठशाला चालते. विविध प्रांतातून आलेले हे कामगार इथे कष्टाने पोट भरतात. पण एका ठिकाणी किती दिवस वास्तव्य आहे. हे माहिती नसल्यामुळे येथील जास्तीत जास्त मुलांना कुठल्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नाही. त्यांना शिक्षणाचे महत्व नसल्यामुळे ही मुले वस्तीमध्ये किंवा रस्त्यावर खेळताना आढळतात. आई वडील कामावर गेल्यावर ही मुले बरेचदा एकटीच असतात व घर सांभाळण्यासाठी मुलांना शाळेत पाठवायची पालकांची इच्छा नसते. त्यामुळे त्यांच्याच वस्तीमधे जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देत शिकवले जाते. ब-याचशा मुलांनी सकाळचा आहारही घेतलेला नसतो. त्यामुळे या मुलांना दररोज काहीतरी खायला देण्यात येते.

दररोज दोन तास चालणा-या या पाठशाळेमध्ये मुलांना अभ्यासासोबत विविध कलाही शिकविल्या जातात. तसेच सर्व सण, विविध दिवस मनविले जातात. देशासाठी लढणा-या जवानांची माहिती देण्यापासून योगाचे महत्व व कसे करायचे हे पण शिकविले जाते. संगणकाची जरुरी असलेल्या जमान्यात मुलांना संगणक हाताळायला दिला जातो. आत्मसुरक्षेचे धडे दिले जातात.

मुलांबरोबर महिलांनाही शिकविले जाते. त्यांना स्वावलंबनाचे धडे देताना विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले जातात. पेपर बॅग्स, कापडी पिशव्यांसारख्या गोष्टी या महिला करायला शिकल्या आहेत. या वस्तीतील 12 वी पास महिलेला शिक्षिका म्हणून घेऊन बाकीच्या महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येत आहे.

या मुलांना दररोज येऊन शिकविल्यास यांच्यातही शिक्षणाची गोडी निर्माण होऊ शकते. पुढे मजदुरी न करता ही मुले नक्कीच काहीतरी मोठे काम करू शकतील. मात्र, यासाठी जास्तीत जास्त लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे. शाळेतील मुलांनी व महिलांनी हिरीरीने भाग घेतला व त्यातील त्यांची कलात्मकता दाखविली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.