Pimpri News : बारामती अॅग्रो लिमिटेडतर्फे महापालिकेला 10  ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स

एमपीसी न्यूज – कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकीतून खासगी कंपन्या विविध यंत्रसामुग्री देऊन सहकार्य करीत आहेत.  बारामती अॅग्रो लिमिटेडच्या वतीने 10 ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. महापालिकेच्या वतीने आयुक्त राजेश पाटील यांनी ही यंत्रसामुग्री स्वीकारली.

बारामती अॅग्रो लिमिटेडचे विपणन व्यवस्थापक दिनेश भोसले यांनी ही यंत्र सामुग्री महापालिकेकडे सुपूर्द केली. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका उषा वाघेरे, वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, सुलक्षणा धर, प्रज्ञा खानोलकर, निकिता कदम, संगिता ताम्हाणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते देविदास गोफणे, निलेश पुजारी, आकाश पवार, विशाल काळभोर, संतोष वाघेरे, अक्षय फुगे, दत्ता बोराडे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियोजन सुरू आहे.  या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरुन शहरातील विविध रुग्णालयांसमवेत समन्वय ठेऊन व्यवस्थापन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रक्रीया सुरु केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी महापालिकेची रुग्णालये अद्यावत सुविधांनी सज्ज ठेवण्यात आली आहेत.  वाढत्या रुग्णांची संख्या  लक्षात घेता अधिक संख्येने उपकरणे, यंत्रसामुग्री आणि सुविधांची उपलब्धता असणे गरजेचे आहे.

विविध कंपन्यांमार्फत सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) महापालिकेला विविध यंत्रसामुग्री देण्यात येत आहे.  बारामती अॅग्रो लिमिटेडच्या वतीने 7 लिटर क्षमतेचे 2 आणि 5 लिटर क्षमतेचे 8 ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स महापालिकेला देण्यात आले.  याबद्दल आयुक्त राजेश पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.