Belgavi : कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक: येडियुरप्पा यांचं सरकार टिकणार; 12 जागांवर भाजपची आघाडी

एमपीसी न्यूज – कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु असून यात 12 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर, काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये पुन्हा येडियुरप्पा यांचं सरकार टिकणार असल्याचं चित्र स्पष्ट होत असून निकालानुसार या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. दरम्यान, काँग्रेसने  पराभव स्विकारला आहे.

या 15 मतदारसंघातील जनादेश आम्हाला मान्य आहे. लोकांनी दलबदलूंना स्विकारले आहे. त्यामुळे आम्ही पराभव स्विकारला आहे. या पराभवामुळे आम्ही निराश होणार नाही, असे काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे.

एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाचे सरकार सत्तेवर आले. आमदारांच्या बंडखोरीनंतर होत असलेल्या विधानसभेच्या 15 जागांपैकी 6 जागांवर विजय मिळवणे येडियुरप्पा सरकारच्या अस्तित्वासाठी महत्वाचं होतं.

गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआउट ,के .आर. पूरम, होसकोटे, चिक्कबळळापूर, विजयनगर, हिरेकेरुर, राणीबेन्नूर, हुनसूर, यल्लापूर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. 225 जागांच्या कर्नाटक विधानसभेत 223 जागांपैकी 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. सध्या भाजपकडे 105, काँग्रेस 68 (11 बंडखोर) जेडीएस 34 (3 बंडखोर), केपीजेपी एक, बसपा एक आणि एक अपक्ष आमदार आहेत.

काँग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार बंडखोर आमदारांचं सदस्यत्व रद्द केलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.