Pimpri: डीपीआर तयार नसताना नदी सुधारच्या दीडशे कोटींच्या निविदा!

एमपीसी न्यूज – गुजरात, अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातील पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्चून एका सल्लागार संस्थेकडून सुरू असलेले सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम खोळंबले आहे. मागील दीड वर्षापासून काम सुरू असताना देखील या संस्थेने डीपाआर तयार करून दिलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. असे असतानाही महापालिकेने तब्बल दीडशे कोटींच्या निविदा काढल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्‍या पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा डीपीआर केला जात आहे. हे काम अहमदाबादच्या मे. एचसीपी डिजाईन प्लॅनिग ऍन्ड मॅनेजमेंट प्रा. लि. या सल्लागार संस्थेला देण्यात आले आहे. त्यांनी पवना व इंद्रायणी नदी पात्राचा सर्व्हे केला आहे. त्याचे आराखडे व नकाशे तयार केले. त्यानुसार नदीमध्ये ठिकठिकाणी मिसळणारे सांडपाणी, टाकला जाणारा घनकचरा, बांधकामे, राडारोडा याचा अभ्यास केला. त्याचा प्राथमिक अहवाल जानेवारी 2019 मध्ये नगरसेवकांसमोर मांडला होता. त्यावेळी नगरसेवकांच्या सूचनाही घेण्यात आल्या.

त्याचवेळी काही दिवसांत अंतिम डीपीआर करून तो सादर केला जाईल, असे सांगितले होते. मात्र, तसे झालेले नाही. उलट अंतिम डीपीआर तयार नसताना सुमारे दीडशे कोटींच्या निविदा दोन्ही नद्यांसाठी महापालिकेने काढलेल्या आहेत. तर, अंतिम डीपीआर झाल्याशिवाय नदी सुधार प्रकल्पाचा संपुर्ण आराखडा समजू शकणार नाही. मात्र, सुमारे दीड वर्षे डीपीआरचे हे काम सुरू असताना अद्याप ते पूर्ण झालेले नाही. अंतिम डीपीआर होत नसल्याने नदी सुधारचा हा प्रकल्प रखडणार का?, असा प्रश्‍नही उपस्थिती होऊ लागलेला आहे.

‘डीपीआर’साठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी
नदी सुधार प्रकल्पाचा डीपीआरचे काम सुरू आहे. यामध्ये नद्यांच्या हायड्रोलिक मॉडेलिंगच्या कामाचा अंतर्भाव केला जात असल्याने विलंब झाला आहे. परंतु, येत्या सहा महिन्यांत हा डीपीआर पूर्ण होईल. तसेच, नदी सुधार प्रकल्प पुढे जाईल, असे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.