Corona vaccine: ‘सीरम’पेक्षा ‘कोव्हॅक्सिन’ अधिक प्रभावी असल्याचा भारत बायोटेकचा दावा

एमपीसी न्यूज : कोरोनावरची कोव्हॅक्सिन लस 81% प्रभावी ठरल्याचा दावा हैदराबादच्या कंपनी भारत बायोटेकने केला आहे. कोव्हॅक्सिनची क्षमता पडताळण्यासाठी कंपनीने तिसऱ्या टप्प्यात चाचण्या घेतल्या होत्या. 18 ते 98 वर्षांपर्यंतच्या 25,800 लोकांवर या चाचण्या करण्यात आल्या. यात 2433 लोकांचे वय 60 हून अधिक होते, तर 4500 लोकांना गंभीर आजार होते.

भारतात कोरोना लसीसाठी घेतलेल्या चाचण्यांतील ही सर्वात व्यापक चाचणी होती. आयसीएमआरच्या सहकार्याने या चाचण्या करण्यात आल्या होत्या. भारत बायोटेकचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक कृष्ण एला म्हणाले, ‘लसीच्या शोधकार्यात आजचा दिवस एक मैलाचा दगड ठरला आहे. आम्ही आतापर्यंत तीन टप्प्यातील चाचण्यांचा डाटा जाहीर केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत तो अधिक प्रभावी असल्याचे स्पष्ट होत आहे. नव्याने येत असलेल्या विषाणूंशी लढण्याच्या दृष्टीने हे कोव्हॅक्सिन अत्यंत प्रभावी आहे.’

सुमारे 40 देशांनी कोव्हॅक्सिन खरेदी करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. देशात कोरोनापासून बचावासाठी कोव्हॅक्सिनशिवाय ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाची कोविशील्ड लसही वापरली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.