Blog by Rajendra Pandharpure : काँग्रेसचे भूमकर दादा…

एमपीसी न्यूज (राजेंद्र पंढरपुरे) : पुण्यातील काँग्रेस भवन आणि महापालिका भवन माझ्या 42 वर्षांच्या पत्रकारितेतील अविभाज्य घटक आहे. 1979 साली मी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत पुणे महापालिका आणि पुण्याचे राजकारण हेच माझे कार्यक्षेत्र राहिले. 1979 पासून 2017 पर्यंत मधली दोन, तीन वर्ष वगळता काँग्रेस पक्षाचे वर्चस्व महापालिकेवर होते. त्यामुळे हा पक्ष बातम्यांचे केंद्र होता. अर्थातच, राजकीय वार्ताहर म्हणून काँग्रेस भवनात जावे लागे. महापालिका भवन आणि काँग्रेस भवन एकमेकांच्या अगदी नजीक असल्याने काँग्रेस भवनात जाणे – येणे सतत होत राहिले. काँग्रेसशी जवळीक वाढली.

एवढ्या वर्षात काँग्रेस भवनाला कुलूप लागले असा एकही दिवस मी पाहिला नाही. भवनाची दारे दिवसभर खुली राहिली. शासकीय सुटी असेल तेव्हा पालिका बंद असायची पण, काँग्रेस भवन खुले असायचे. निवडणुका जवळ आल्या की काँग्रेस भवन गजबजून जाते, निवडणुका संपल्या की पुन्हा शुकशुकाट. पण या शुकशुकाटात काँग्रेस भवनात कार्यालयीन सचिव उत्तम भूमकर, रामचंद्र भुवड हमखास भेटायचे.

मला आठवतयं की नारायण गरदास कार्यालयीन सचिव होते आणि नंतर उत्तमराव झाले. उत्तमरावांची कारकीर्द 30-35 वर्षांची झाली. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तीनही ऋतूत भूमकर यांना काँग्रेस भवनात पक्षाचे काम करताना मी पाहिले आहे. त्यांनी प्रकृतीही उत्तम राखली होती. या प्रदीर्घ काळात पक्षाचे आठ-दहा शहराध्यक्ष तरी भूमकर यांनी पाहिले असतील. शहराध्यक्ष, पक्षाचे खासदार, आमदार या सर्वांचे गुणदोष, त्यांची खास माणसे याची चांगली माहिती भूमकर यांना होती. ते सगळं लक्षात घेऊनच ते सचिव म्हणून काम करायचे. पक्षाच्या विचारांशी त्यांची बांधीलकी होती.

एखादा पदाधिकारी मग, तो वयाने ज्येष्ठ असो अथवा कनिष्ठ. तो काही वावगं वागत असेल तर, त्याला शांत आणि संयमी शब्दात जाणीव देण्याचे धैर्य भूमकरांच्या अंगी होते. त्यांची ज्येष्ठता आणि बांधीलकी याकारणाने त्यांना कोणी प्रतिवाद करत नसे, अशीही उदाहरणे पाहिली आहेत. काँग्रेस पक्षाविषयीचीच माहिती ते ठेवत होते असे नाही तर, भाजप, जनता दल, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या पक्षातील घडामोडींची बारकाईने माहिती  त्यांच्याकडे असे. या पक्षांमधील जाणते नेते, कार्यकर्ते भूमकरांविषयी आदराने बोलत असत. माहितीचे नेमके आणि मोजक्या शब्दात विश्लेषण करण्याची ताकद त्यांच्यात होती. शहराच्या राजकारणाची त्यांना उत्तम जाण होती. निवडणुकांची उमेदवारी यादी घोषित झाली की, ते अंदाज व्यक्त करायचे आणि बऱ्याचदा त्यांचा अंदाज अचूक ठरलेला मी पाहिला. त्यामुळे भूमकरांशी दहा पंधरा मिनिटे गप्पा मारल्या की शहराच्या राजकारणाचा अंदाज यायचा. त्या दृष्टीने पाहिले तर ते  मार्गदर्शक होते. त्यांच्यातील या विलक्षण गुणांचा फायदा काँग्रेस नेत्यांनी आणि प्रदेश काँग्रेसने अधिक घ्यायला हवा होता.

काँग्रेस भवनात सर्व वर्तमानपत्रे येतात, त्याचे वाचन कितीजण करतात याविषयी शंका आहे. पण, भूमकर मात्र सर्व वर्तमानपत्रांमधील महत्त्वाच्या बातम्या, अग्रलेख बारकाईने वाचत असत हे मी अनेकवेळा पाहिले आहे. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. त्यांच्या बोलण्यात त्या बातम्यांविषयीचे संदर्भ यायचे. पुण्यातील वृत्तपत्र कार्यालयातील घडामोडी, बातमीदार याच्याही नोंदी भूमकरांकडे असायच्या. त्या बातमीदारांचेही त्यांनी चांगला, मध्यम असे ग्रेडेशन केले होते. कार्यालयीन सचिव म्हणून त्यांचा पत्रकारांशी निकटचा संबंध यायचा. पण, या संबंधांचा फायदा त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कधी घेतला नाही. माझ्या आधीच्या पिढीतील पत्रकार गजानन खोले, गोपाळराव बुधकर यांच्याशीही त्यांची मैत्री होती. गप्पांच्या ओघात त्यांच्या आठवणीही त्यांनी मला अनेकवेळा सांगितल्या.

भूमकरांचे निरीक्षण चौफेर होते. काँग्रेस भवनातील सचिवाच्या खुर्चीत बसून संपूर्ण शहराच्या राजकारणाचा वेध घेण्याचा आवाका त्यांच्याकडे होता. त्यामुळे असेल, त्यांच्याशी राजकीय चर्चा करताना आनंद वाटायचा. अशा असंख्य चर्चांमधून आमचा स्नेह वाढला. वयातील अंतर या स्नेहाच्या आड त्यांनी येऊ दिले नाही. त्यांच्या निधनाची घटना राजेंद्र भुतडा यांनी मला सांगितली. त्या आधारे बातमी लिहीताना भूमकरांच्या अनेक आठवणी दाटून आल्या. माझी आणि त्यांची ओळख झाली तेव्हा त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली होती. कामातील नेटकेपणा, वक्तशीरपणा आणि त्यांनी राखलेली प्रकृती पहाताना भूमकरांचे वय लक्षात आले नाही. ऐंशीव्या वर्षीही हा माणूस पक्षासाठी कार्य करीत होता. असा निष्ठावान सचिव मिळणे विरळच.

भूमकर यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी काँग्रेस संघटनेला खरोखरच बराच काळ जाणवेल. पांढरी टोपी काँग्रेसजनांची ओळख आहे. अलीकडे अशी टोपी परिधान करणारे काँग्रेसजन हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच असतील. भुमकर हे त्यापैकी होते. खऱ्या अर्थाने ते अंतर्बाह्य काँग्रेसी होते.

काँग्रेस भवनात भूमकर हमखास भेटतील याची खात्री असायची. त्यांना भेटण्याची सवयच होऊन गेली होती. भूमकर गेले, जगाचा निरोपही त्यांनी काँग्रेस भवनातूनच घेतला. त्यांची पक्षनिष्ठा आणि सेवा अनेक वर्ष सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात राहील.

भूमकर यांना विनम्र श्रद्धांजली!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.