Bhosari : महिनाभरानंतरही अपघाताच्या घटनेतील आरोपी मोकाट; पोलिसांच्या भूमिकेवर नातेवाईकांचा संशय

वसीम यांचे मित्र इर्शाद खान यांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. : accused not arrested in the accident even after a month; Relatives suspect police role

एमपीसी न्यूज – भोसरी येथे सीआयआरटी समोर झालेल्या एका अपघातात अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत 9 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या घटनेला महिना लोटत आला तरीही पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यासाठी जाणीवपूर्वक चालढकल केली जात असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे.

वसीम उर्फ पप्पू करीम सय्यद असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी इर्शाद सलीम जहागीरदार (वय 29, रा. शांतीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी एमएच 14 / एफएम 8753 या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मयत वसीम आणि त्यांचा मित्र इर्शाद खान हे दोघेजण मिळून भोसरीकडून पुण्याकडे जाणा-या रस्त्यावर नाशिक फाट्याजवळ सीआयआटी जवळ फळविक्रीचा व्यवसाय करीत होते.

8 जुलै रोजी दुपारी साडेपाच वाजता एम एच 14 / एफ एम 8753 या कारने वसीम यांना जोरात धडक दिली. यामध्ये वसीम गंभीर जखमी झाले.

कार चालकाने वसीम यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव जास्त झाल्याने कार चालकाने वसीम यांना वायसीएम रुग्णालयातून डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले.

तिथे उपचारापूर्वी वसीमचा मृत्यू झाला. याबाबत वसीम याचे नातेवाईक इर्शाद जहागीरदार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वसीम यांचे मित्र इर्शाद खान यांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. फिर्याद दाखल करताना अनेकदा फोन करून बोलावून घेतले.

मात्र, फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. पोलिसांनी यामध्ये आरोपीकडून पैसे घेतले असल्याची शंका असल्याचेही इर्शाद खान यांनी सांगितले.
भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे म्हणाले, ‘या प्रकरणाचा तपास ज्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे आहे. त्यांना कोरोनाचे निदान झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे या तपासासाठी विलंब लागत आहे. संबंधित अधिकारी रुजू झाल्यानंतर याचा तपास केला जाईल. दरम्यान, मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालतो.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.