Bhosari: भाजपचे महेश लांडगे अन् अपक्ष विलास लांडे यांच्यात ‘फाईट’!

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे आणि अपक्ष विलास लांडे यांच्यात पुन्हा सामना रंगणार आहे. दोघांमध्ये दुरंगी लढत होत असून दोनवेळा अपक्षांच्या बाजूने कौल देणारे भोसरीकर तिस-यावेळी अपक्षाच्या की पक्षाच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भोसरीच्या लढतीकडे शहरवासियांचे लक्ष्य लागले आहे. 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भोसरी मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. त्यावेळी अपक्ष लढलेले विलास लांडे यांना पहिला आमदार होण्याचा मान मिळाला. तर, 2014 च्या निवडणुकीवेळी महेश लांडगे अपक्ष निवडून आले. त्यामुळे सलग दोन निवडणुकीत भोसरीकरांनी अपक्षांच्या बाजूने कौल दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारण्यास विलास लांडे यांनी नकार दिला. लांडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने त्यांना पुरुस्कृत केले आहे.

महेश लांडगे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केले आहेत. त्या कामांच्या जोरावार ते निवडणुकीला सामोरे जात असून प्रचाराची त्यांची पहिली फेरी पूर्ण झाली असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून विलास लांडे यांनी देखील बैठका सुरु केल्या आहेत. लांडगे यांच्यावरील नाराजांच्या भेटी गाठी सुरु केल्या आहेत. चिखली परिसरात ताकद असलेले दत्ता साने, जालिंदर शिंदे यावेळी लांडे यांच्यासोबत आहे. शिवसेना, भाजपमधील नाराजांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीवर लांडे यांची मदार आहे. लांडे अपक्ष निवडून येण्याचा चत्मकार करतात की लांडगे भाजपकडून निवडून येतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

‘हे’ आहेत उमेदवार
भाजप महेश लांडगे, अपक्ष विलास लांडे, समाजवादी पार्टीच्या वहिदा शेख, बीआरएसपीचे ज्ञानेश्वर बो-हाटे, जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख, महाराष्ट्र मजदूर पक्षाचे भाऊ अडागळे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र पवार, अपक्ष हरेश डोळस, छाया जगदाळे, मारुती पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

‘यांनी’ घेतली माघार!
माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, दत्तात्रय जगताप, डॉ. मिलिंदराजे भोसले, विष्णू शेळके, महेश तांदळे यांनी माघार घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.