Pune News : पराभव समोर दिसल्याने भाजपा नेते भांबावले; राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांचे बीडकर यांना प्रत्युत्तर

एमपीसी न्यूज – जेव्हापासून कोल्हापूरातून येऊन चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपा पक्ष खिशात घातला तेव्हापासून पुणे शहर भाजपामध्ये भयंकर गोंधळ सुरु असून त्यांची विधाने देखील विसंगत असल्याचे जाणवू लागले आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणुकीत पराभव थेट समोर दिसू लागल्यापासून सगळेच नेते भांबावले असून महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांनी आज केलेली विधाने याचेच स्पष्ट उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.

देशमुख म्हणाले, की ” एकीकडे बीडकर शंभर प्लस जागा जिंकण्याचा दावा करतात आणि दुसरीकडे प्रभाग रचनेविषयी राज्यसरकारने सत्तेचा दुरूपयोग केला म्हणतात, जर त्यांना शंभरपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा ठाम विश्वास असेल तर ते थेट निवडणूक प्रचारालाच का सुरुवात करीत नाहीत? हा केवळ एकट्या बीडकर यांचा प्रॉब्लेम नसून भाजपाचे सगळेच नेते थोड्याफार प्रमाणात भांबावलेले असून निवडणूकीपुर्वीच त्यांनी आपला पराभव मान्य केला आहे.”

आपलं सगळं आलबेल चाललेलं असताना बाहेरुन आलेल्या माणसानं आपल्यावर बॉसींग करणं हे शहर भाजपातील बहुतांश नेत्यांना आजही पचनी पडलेलं नाही. त्याचे फस्ट्रेशन काढण्यासाठी ते अशा प्रकारचे दावे करतात. बीडकर यांनी केलेले दावे आणि त्यामागचे कारण लक्षात येत असून त्यांच्याप्रती पुर्ण सहानुभूती आहे असेही देशमुख शेवटी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.