Pimpri News : प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर आता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम आला आहे. निवडणूक प्रभागांच्या भौगोलिक सीमांच्या प्रारुपानुसार मतदार यादी विभाजनाचे काम आज (गुरूवार) पासून सुरू करुन 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून मार्चमध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावी. ही मतदार यादी, मूळ यादी आणि पुरवणी या स्वरुपात प्राप्त होईल. पुरवणी मतदार यादीमध्ये जी नावे वगळण्यात आल्याचे नमूद केले असेल. त्या नावांसमोर मूळ मतदार यादीत वगळल्याचा शिक्का असेल. तो लक्षात घेऊन वगळणे आवश्यक आहे. असा शिक्का नसल्यास पुरवणी मतदार यादीवरुन तपासून मूळ मतदार यादीवर तसा शिक्का मारण्यात यावा.

मूळ मतदार यादी व पुरवणी यादी या दोन्ही मतदार याद्यांसह प्रभागनिहाय विभाजन करण्यात यावे. मतदार यादीचे निवडणूक प्रभागनिहाय विभाजन करण्याची प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. निवडणूक प्रभागांच्या भौगोलिक सीमा अंतिमरित्या प्रसिद्ध झाल्यानंतर हद्दीमध्ये झालेल्या बदलांच्या अनुषंगाने मतदार यादीच्या विभाजनामध्ये योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात.

तांत्रिक स्वरुपाचे काम करणारे कर्मचारी, अधिका-यांची 8 फेब्रुवारीपर्यंत नावे कळवा

दरम्यान, राज्य निवडणूक आयागोकडून संगणक प्रणालीचा वापर करुन मतदार यादी तयार करण्यासाठी कंट्रोल चार्ट तयार करणे. त्याद्वारे मतदार यादीचे विभाजन करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी तांत्रिक स्वरुपाचे काम करणारे कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती करुन त्यांची नावे राज्य निवडणूक आयोगास 8 फेब्रुवारीपर्यंत कळवावी. प्रशिक्षणामध्ये दिलेल्या सुचनांनुसार राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कंट्रोल चार्ट अपलोड करुन प्रारुप मतदार यादी तयार करता येईल. त्यानंतर आयोगाकडून मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम स्वतंत्ररित्या देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदार यादी घेणार

प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम आयोगाने दिला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत त्याचे काम पूर्ण करायचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेली मतदार यादी मागवून घेतली जाणार आहे. त्यानुसार प्रभागनिहाय मतदारयादीचे विभाजन केले जाईल, असे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

शहरात 67 हजार 276 मतदार वाढले; शहरातील मतदारसंख्या 14 लाख 32 हजार

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत मतदान नोंदणी अभियान राबविले होते. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या 3 विधानसभा मतदारसंघात नव्या मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे. त्यामुळे तीनही मतदारसंघात एकूण 67 हजार 276 मतदारांची वाढ झाली आहे. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 14 लाख 32 हजार 340 झाली आहे. पिंपरी मतदारसंघात 3 लाख 68 हजार 802, चिंचवडमध्ये 5 लाख 64 हजार 995 आणि भोसरी मतदारसंघात 4 लाख 98 हजार 543 मतदार आहेत. तीनही मतदारसंघात एकूण 14 लाख 32 हजार 340 मतदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.