Pfizer Vaccine : या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत देशाला फायझर लसीचे पाच कोटी डोस मिळण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज : भारतात कोरोना लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्यावर आता उपाय म्हणून सरकारच्या वतीने लसी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भारत सरकार आणि अमेरिकन लस निर्मिती करणारी कंपनी फायझर यांच्या दरम्यान एक उच्च स्तरीय चर्चा अंतिम टप्प्यात आली असून देशाला या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत पाच कोटी लसीचे डोस मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

फायझरने भारत सरकारच्या लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी ना नफा या तत्वावर लसीचा पुरवठा करण्याची ऑफर भारत सरकारला दिली होती. तसेच फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी त्यांच्या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी, अशी विनंती भारत सरकारकडे केली होती.

सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या लसींच्या वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे. त्यात आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीची आयात करण्यात आली आहे. आता फायझरच्या लसीचा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यता असून मॉडर्नासोबतही चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.