Chakan News : मास्क लावण्यास सांगितल्याने पेट्रोल पंपावरील कामगारांना टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज – वाहनामध्ये गॅस भरण्यासाठी आलेल्या एका वाहनचालकाला मास्क लावण्यास सांगितल्याने वाहन चालक आणि त्याच्या पाच साथीदारांनी पेट्रोल पंपावर काम करणार्‍या चार कामगारांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी दीड वाजताच्या सुमारास म्हाळुंगे येथील भारत पेट्रोलियमच्या शुभम पेट्रोल पंपावर घडली.

नामदेव दिलीप जरे (वय 27, रा. वराळे, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंभू भोसले, त्याची आई आणि अनोळखी चार व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नामदेव जरे हे म्हाळुंगे येथील भारत पेट्रोलियमच्या शुभम पेट्रोल पंपावर काम करतात. शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपी शंभू भोसले त्याच्या वाहनात गॅस भरण्यासाठी आला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला मास्क लावण्यास सांगितले. तसेच मास्क नाही लावला तर गॅस भरुन देणार नाही असे देखील बजावले.

या कारणावरून आरोपींनी फिर्यादी नामदेव जरे यांच्यासह पेट्रोल पंपावर काम करणारे कामगार लक्ष्मण मामडे, गजानन म्हसे, किरण जरे, अश्विनी जरे यांना लाकडी दांडके, स्टूल, दगड यांनी मारहाण केली. यामध्ये पेट्रोल पंपावर काम करणारे कामगार जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.