Chinchwad : आईला घरात डांबून ठेऊन मारहाण करणा-या मुलीवर गुन्हा

Case filed against daughter for beating her mother while locked in home.

एमपीसी न्यूज – शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या स्वतःच्या आईला जबरदस्तीने घरात डांबून ठेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करणा-या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बहिणीने आपल्या सख्या बहिणीच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च 2020 ते 10 ऑगस्ट 2020 या कालावधीत घडला आहे.

सुलभा हेमंत बि-हाडे (वय 57, रा. आयआयटी स्टाफ क्वार्टर्स, पवई मुंबई) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा सचिन शहा (रा. विजयश्री सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आयआयटी पवई मध्ये सिनीयर अडमिनीस्ट्रेटीव्ह असिस्टंट या पदावर नोकरीस आहेत. त्यांच्या दोन बहिणी आहेत. त्यातील एक बहिण शाहूनगर चिंचवड येथे राहते.

फिर्यादी यांच्या आई सुशीला सावंत पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस होत्या. त्या 1992 साली निवृत्त झाल्या आहेत. फीर्यादी यांचे वडील 2011 साली वारले. त्यानंतर आई सुशीला फिर्यादी यांच्या भावासोबत अजमेरा पिंपरी येथे राहत होत्या. भावाचा देखील 2017 साली मृत्यू झाला.

त्यानंतर काही दिवस फिर्यादी यांनी त्यांच्या आईला त्यांच्याकडे राहण्यासाठी नेले. त्यानंतर अजमेर पिंपरी येथे एक भाड्याची खोली घेऊन दिली आणि चोवीस तास सेवेसाठी एक मोलकरीण ठेवली.

अशी व्यवस्था लावलेली असताना आरोपी बहिण मनीषा शहा आणि तिचा पती गोवा येथील नोकरी सोडून फिर्यादी यांच्या आईच्या घरी राहायला आले. मनीषा आणि तिचा पती घरकामासाठी येणा-या महिलांसोबत भांडण करून त्यांना काम सोडण्यास भाग पाडत होते.

वारंवार होणा-या तक्रारीवरून अजमेर येथील घर मालकाने घर खाली करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी मनीषा हिने आई सुशीला यांना मार्च 2020 मध्ये शाहूनगर, चिंचवड येथील विजयश्री सोसायटीमध्ये राहायला नेले.

त्यानंतर मनीषाने आई सुशीला यांना रोज शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच त्यांना उपाशी ठेवले. आईला फोनवर देखील बोलू दिले नाही.

हा प्रकार आई सुशीला यांनी त्यांची तिसरी मुलगी सुमय्या यांना फोन करून सांगितला. हा प्रकार माहिती झाल्यानंतर फिर्यादी सुलभा आणि त्यांचा मुलगा मनीषा हिच्या घरी आले.

आईने सुलभा यांना होत असलेला प्रकार सांगितला. त्यामुळे सुलभा यांनी आई सुशीला यांना आपल्याकडे मुंबईला घेऊन जात असल्याचे मनीषाला सांगितले.

त्यावरून मनीषाने आईला घेऊन जायचे नाही, असे म्हणून सुलभा यांच्याशी भांडण केले. तसेच त्यांना घरातून बाहेर काढले. याबाबत सुलभा यांनी त्यांच्या सख्या बहिणीविरोधात आईचा छळ केल्याची फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.